महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांच्या पोस्टमॉर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Bhushan Heatstroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर गेली आहे. दरम्यान  मृतांच्या पोस्टमॉर्टमधून (Post Mortem Report ) काही माहिती समोर आली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 20, 2023, 04:41 PM IST
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांच्या पोस्टमॉर्टमधून धक्कादायक माहिती उघड title=

Kharghar Heatstroke Death: महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे (Heat Stroke) मृत्यू झालेल्यांची संख्या 14 वर गेली आहे. यादरम्यान कार्यक्रमातील काही कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चेंगराचेंगरी झाल्यानेही मृत्यू झाल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान मृतांचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आला असून उष्माघातामुळेच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. 

मृतांच्या शरिरावर जखमा

मृतांच्या अंगावर जखमा असल्याचे आरोप काही नातेवाईकांनी केले होते. पण डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम अहवालात यासंबंधी उल्लेख केला नसल्याने नातेवाईक संभ्रमात आहे. दरम्यान उष्माघातामुळे चक्कर येऊन पडल्याने काहींना जखम झाली असावा असा अंदाज आहे. मात्र मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं?

खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण  पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार दिला जाणार होता. खारघरमधील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानात आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी राज्यभरातून लाखो श्रीसदस्य उपस्थित राहणार असल्याने वाहतुकीची सोय करण्यात आली होती. हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकही या कार्यक्रमासाठी रद्द करण्यात आला होता. पण कार्यक्रमस्थळी उन्हापासून बचाव करण्याची कोणतीही सोय करण्यात आली नसल्याने शेकडो श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. याच उष्माघातामुळे तब्बल 14 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

कार्यक्रमाच्या दिवशी तापमान 39 ते 40 डिग्रीपर्यंत होतं. उष्माघाताचा त्रास होऊ लागल्यानंतर काही जणांवर तिथेच उपचार करण्यात आले. पण गंभीर असणाऱ्यांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान रविवारी 11 जणांनी आपला जीव गमावला. नंतर आणखी तिघांचा मृत्यू झाला असून ही संख्या 14 वर गेली आहे. मृतांमध्ये 8 महिलांचा समावेश आहे.

खारघर दुर्घटनेनंतर राज्य सरकारचा निर्णय

खारघर दुर्घटनेनंतर राज्य सरकारने दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश दिले आहेत.  जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. महिला व बालविकास मंत्री मगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे. 

राजकारण न करण्याचं आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं आवाहन

दरम्यान या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याने आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निवेदन प्रसिद्ध करत राजकारण करु नये असं आवाहन केलं आहे. 

महाराष्ट्र शसानाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे ‘श्री’ सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. ‘श्री’ सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी काही सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्देवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दांत व्यक्त करण्यापलिकडचे आहे, अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली आहे. खारघरमध्ये झालेला प्रकार दुर्देवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नवे, अशी आमची अपेक्षा आहे, असंही आवाहन त्यांनी केलं आहे.