पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू

Pune Accident : मध्य प्रदेशातील तीन शेतमजुरांचा पुण्यातील शिरुर येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कल्याण नगर महामार्गावर भरवाध कारने पाच मजूरांना रविवारी रात्री चिरडलं आहे. या अपघातात दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

आकाश नेटके | Updated: Sep 25, 2023, 08:16 AM IST
पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडलं, तिघांचा मृत्यू title=

Pune News : पुण्यात (Pune) रविवारी रात्री मध्य प्रदेशातून (MP) आलेल्या मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी (Pune Police) जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. भरधाव कारने रस्त्याने चालणाऱ्या या पाच मजूरांना चिरडलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील दत्त मंदिराजवळ असलेल्या कठेश्वरी पुलाजवळ हा भीषण अपघात घडला. कल्याणहून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मध्य प्रदेशातील पाच मजुरांना चिरडले. त्यातील दोन मजूरांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच इतर दोन गंभीर जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. मध्यप्रदेशवरून दोन-तीन दिवसांपूर्वीच काही शेतमजूर डिंगोरे येथे कामासाठी आले होते.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनेश जाधव विक्रम तारोले या दोघे गंभीर जखमी झाले असून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  रविवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शेतातील कामे संपवून हे मजूर पायी रस्त्याने जात होते. त्यावेळी कल्याण-नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत दत्त मंदिरा जवळील कठेश्वरी पुलालगत भरधाव जाणाऱ्या गाडी क्र. एम एच 12 व्ही क्यू 8909 ने पाच मजुरांना चिरडले. त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच डिंगोर गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावर ट्रक व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता. डिंगोरे गावच्या हद्दी नगर कल्याण महामार्गावर हॉटेल पुढारी समोर हा अपघात घडला होता. सचिन सूर्यवंशी याचा या अपघातात मृत्यू झाला. संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारा बनकर फाट्यावरून डिंगोरेकडे जात असताना हॉटेल पुढारीसमोर दुचाकी व ट्रकचा अपघात झाला. यात सचिन सूर्यवंशीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच  ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत या अपघाताबाबत माहिती घेऊन गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.