'...तर आम्हालाही एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्या'; आठवलेंची मागणी

भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच मागणी केली आहे. 

Updated: Jun 23, 2019, 07:53 PM IST
'...तर आम्हालाही एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्या'; आठवलेंची मागणी title=

पुणे : भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु असतानाच आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच मागणी केली आहे. भाजपा शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा होत असेल तर आम्ही सुध्दा एक वर्ष मुख्यमंत्रीपद मागू शकतो असं विधान, आर पी आय नेते रामदास आठवले यांनी केलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयला १० जागा मिळाव्यात. त्यापैकी एक जागा पुण्यातली असावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. त्याचवेळी आपण कमळाबरोबर आलो आहोत, मात्र कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना-भाजपने युती टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात तीन जागा व पुण्यात किमान एक जागा मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेने सामंजस्याने घ्यावे. अडीच-अडीच वर्षावर चर्चा होत असल्यास भाजप सेनेला दोन-दोन वर्षे आणि रिपब्लिकन पक्षाला एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.