Maharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन!

Maharastara Rain Effect On farmer : एका महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 26, 2023, 07:42 PM IST
Maharastara Rain : पावसाची पाठ अन् शेतकरी संकटात, धक्कादायक अहवालाने वाढवलं सरकारचं टेन्शन! title=
Maharastara drought Rain farmer

Maharastara crop inspection report : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिना सरत आलाय मात्र राज्यात अद्यापही हवा तेवढा पाऊस झालेला नाहीये. ऑगस्ट महिन्यात तर केवळ 31 टक्के एवढाच पाऊस झाल्याची माहिती समोर आली होतीय. सोयाबीन, मका ही पिके आता फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. मात्र पावसानं ओढ दिल्यानं पिकं करपू लागलीत. नद्या नाले कोरडे ठाक पडलेत, विहिरी तळ गाठू लागल्यात. पावसाचा केवळ एकच महिना शिल्लक राहीलाय.. या महिन्यात पाऊस न झाल्यास पीक उत्पादनात 60 ते 70 टक्के घट होईल, असा अंदाज पीक पाहणी अहवालात मांडण्यात आलाय. राज्यातील धरणांतील जलसाठाही चिंताजनक आहे. पावसानं खंड दिल्यानं राज्यावर दुष्काळाचं संकट ओढावलं आहे.

आंबेगाव तालुक्यातील लोणी परिसरात पावसाने दडी मारल्यानं पिकं करपू लागली आहेत. महिनाभरापासून  लोणी परिसरात पाऊस झाला नाहीये. त्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झालाय. ऑगस्ट संपत आला तरी शेतकरी पावसाची वाट पाहतोय. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पीक धोक्यात आलं. पिकांवर मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय. एकीकडं एक महिन्यांपासून जिल्ह्यात पाऊस नाही. तर आता रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. तर राज्याच्या इतर भागात देखील परिस्थिती वेगळी नाही. अकोला, वाशि, बुलढाणा, यवतवाम, अमरावती, नागपूर वर्धा आणि भंडारा या भागात पावसाची टक्केवारी कमी झाल्याचं पहायला मिळतंय. तर दुसरीकडे मराठवाड्यात देखील पावसाचा अभाव जाणवतोय. 

औरंगाबाद, धाराशिव, लातूर, बीड, परभणी या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद आहे. अशातच येत्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस नसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांची चिंतेत भर पडली आहे. कृषी विभागाने 1 जून 2023 ते 24 ऑगस्ट 2023 पर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीबाबतचा पीक पाहणी अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 759 मिमी पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी परिस्थितीचे महसूल, कृषी व विमा प्रतिनिधींना सात दिवसांत तालुकानिहाय पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आणखी वाचा - Maharashtra Rain : भ्रमनिरास! राज्यातील पावसाच्या पुनरागमनाची तारीख आता आणखी लांबली

दरम्यान, राज्यातील पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती, शेतकऱ्यांसाठी उपाययोजना, मंडळनिहाय पर्जन्यमान, पाणीसाठा, चारा नियोजनावर कृषीमंत्र्यांनी महत्त्वाची बैठकी घेतली. त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले होते. मात्र, परतीचा पाऊस चांगला झाला तर शेतकऱ्यांचं संकट टाळलं जाऊ शकतं.