रिपाईला विधानसभेच्या १० जागा हव्यात; रामदास आठवलेंची मागणी

या निवडणुकीत रिपाई  भाजपच्या नव्हे तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल.

Updated: Sep 5, 2019, 03:09 PM IST
रिपाईला विधानसभेच्या १० जागा हव्यात; रामदास आठवलेंची मागणी title=

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपाच्या चर्चेला गुरुवारपासून सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरु असलेली रस्सीखेच पाहता जागावाटपाचा मुद्दाही ताणला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (रिपाई) सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत १० जागा मिळायलाच हव्यात अशी मागणी केली आहे. 

भाजप आणि शिवसेनेने मित्रपक्षांना १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी १० जागांवर रामदास आठवले यांनी हक्क सांगितला आहे. तसेच या निवडणुकीत रिपाई  भाजपच्या नव्हे तर स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवेल, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महायुतीमधील इतर घटकपक्षांच्या वाट्याला केवळ आठच जागा येतील. परिणामी इतर घटक पक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. 

तर दुसरीकडे गुरुवारी जागावाटपासाठी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची पहिली बैठक आज पार पडली. यावेळी भाजपने १६० जागांची मागणी केली. मात्र, शिवसेनेने ११० पेक्षा कमी जागा स्वीकारायला नकार दिला. भाजपकडून नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात स्वबळावर लढल्यास पक्षाला १६० जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष पुढे आला होता. तर महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.

युती होणार ?
भाजपचे सध्या १२२ आमदार तर शिवसेनेचे ६३ आमदार आणि मित्रपक्षांच्या १८ जागा याची बेरीज केली तर ती होते २०३, एकूण २८८ जागांमधून २०३ वजा केले तर उरतात ८५ जागा. या ८५ जागांचे निम्मे केले तर ४२.५ म्हणजेच साधारण ४३ जागा होतात. आता यातील भाजपच्या वाट्याला १२२आणि ४३ म्हणजेच १६५ आणि शिवसेनेच्या ६३ आणि ४३ अशा १०६ जागा होतात. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्या आमदारांच्या जागावर हे दोन्ही पक्ष आग्रह धरतील. त्यामुळेच सध्याची ही राजकीय स्थिती पाहता युती होण्याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जाते आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे नेते अजूनही युती होणारच असा दावा करत आहेत.