महाविकासआघाडीत मतभेद, उद्धव यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले

 सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं मिरजमध्ये वक्तव्य

Updated: Feb 25, 2020, 04:51 PM IST
महाविकासआघाडीत मतभेद, उद्धव यांनी आमच्यासोबत यावं - रामदास आठवले title=

मिरज : राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही. या तीन पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या सोबत यावं. आपण पुन्हा एकत्र महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. 

दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषदेच्या उद्घाटनानंतर रामदास आठवले बोलत होते. NRC आणि CAA हा कायदा मुस्लीम विरोधी नसून सरकारने याबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिलेले आहे. काँग्रेसने या कायद्या बाबत मुस्लीम समाजात गैरसमज केला आहे. जर या कायद्यामुळे मुस्लीमांवर अन्याय झाला तर मी मुस्लीम समाजाच्या पाठिशी आहे. असं वक्तव्य देखील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकारला तीन महिने होत आहेत. भाजप सोबत सत्तेचं गणित न जुळल्याने शिवसेनेने महायुतीमधून बाहेर पडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे सरकारने मागील फडणवीस सरकारचे अनेक निर्णय़ बदलले आहेत. दुसरीकडे भाजपने देखील ठाकरे सरकार विरोधात आता आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.

विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि महाविकासआघाडीमध्ये रोज एकमेकांवर टीका सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.