सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेना नेत्याकडून खून

कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून 

Updated: Feb 7, 2020, 10:15 AM IST
सांगलीत राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेना नेत्याकडून खून title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. देशिंग येथील शेतात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केले. हल्यानंतर आरोपी पसार झाले होते. या हल्ल्यात पाटील हे गंभीर जखमी झाले होते. पाटील यांना मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मनोहर पाटील यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख दिनकर पाटील, अभिजीत पाटिल, विनोद पाटील या तीन आरोपीना कवठेमहंकाळ पोलिसांनी अटक केली आहे. पूर्व वैमनस्यातुन ही हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते दिनकर पाटील यांने आपल्या पुतण्याच्या मदतीने राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या केली आहे. या खुनानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आठवड्याभरात सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा खून झाला आहे. 2 फेब्रुवारीला पलूस तालुक्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा खून झाला होता आणि 6 फेब्रुवारीला कवठेमहांकाळ तालुक्यात कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे. 

दोन्ही खुनातील हल्लेखोर वेगवेगळे आणि वेगवेगळ्या तालुक्यात खून झाले असले तरी दोन्ही खून पुर्व वैमन्यासातून झालेत. मोठ्या राजकीय नेत्यांचेच खून झाल्याने जिल्ह्यात भीतीच वातावरण पसरलं आहे.