‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं

Sangli News : सांगलीत अंथरुणावर खिळलेल्या रुग्णाला नातेवाईकांनी रुग्णवाहिकेतून सरकारी कार्यालयात आणलं होतं. बॅंकेंच्या कर्मचाऱ्यांनी नियमाच्या नावाखाली रुग्णाला सरकारी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आता नातेवाईकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 12, 2024, 06:53 PM IST
‘तुमचे वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या!’ अत्यवस्थ वृद्धाची पेन्शन थांबवली, रुग्णवाहिकेतून बँकेत बोलावलं title=

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सरकारी कामकाजात सर्वसामान्यांना कायमच वाट पाहावी लागते. यामध्ये आता अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांवरही हीच वेळ आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत एका रुग्णाला त्याच्या पेन्शचे पैसे मिळवण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेतून प्रवास करावा लागला आहे. आधीच वेदना सहन कराव्या लागत असताना रुग्णाने आपण जीवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी सरकारी कार्यालयापर्यंत रुग्णवाहिकेपर्यंत प्रवास केला आहे.

पेन्शनची रक्कम मिळावी यासाठी हयात दाखला गरजेचा असतो. तो हयातीचा दाखल मिळवण्यासाठी एका पेन्शनधारक रुग्णाला शासकीय गलथान कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. अर्धांग वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत एका जेष्ठ नागरिकाला ॲम्बुलन्समधून बँक आणि शासकीय ट्रेझरी कार्यालयामध्ये स्ट्रेचरवरून फिराव लागलंय.

सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाळवा तालुक्यातल्या कणेगाव येथील युवराज संभाजी बनसोडे यांना दर महिन्याला पेन्शन मिळते. पण या पेन्शनसाठी त्यांना नियमाप्रमाणे हयातीचा दाखला मागण्यात आला होता. त्यासाठी त्यांना येलूर येथील बँक कर्मचाऱ्यांनी युवराज बनसोडे यांनी सांगलीतील ट्रेझरी ( कोषागार ) कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले. हे कार्यालया बॅंकेपासून तब्बल 50 किमी लांब होतं.

जिवंत असल्याचा पुरावा मिळण्यासाठी बनसोडे यांना प्रकृती अत्यंत खालावली असतानाही सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागले आहेत. बनसोडे यांना त्यांच्या नातेवाईकांनी ॲम्बुलन्समधून सांगलीतल्या ट्रेझरी कार्यालयात आणलं होतं. या धक्कादायक प्रकारामुळे ट्रेझरी आणि बँकेच्या कारभाराविरोधात नातेवाईकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येतोय.

"पेन्शनच्या कामासाठी ट्रेझरीमध्ये आलो होता. बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मला इथे पाठवलं होतं. रुग्ण पॅरिलिसीस असून त्याचा खुबा मोडलेला आहे. रुग्णाला महिन्याभरापासून उठता बसता येत नाही. रुग्णाला आम्ही बॅंकेत घेऊन गेलो होतो. तेव्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी ट्रेझरीला घेून जाण्यास सांगितलं," असे रुग्णाचे नातेवाईक संभाजी बनसोडे यांनी सांगितले.

पालघरमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ पाहायला मिळतो. शासनाकडून शाळांना पुरवलं जाणार धान्य निकृष्ट दर्जाचं पाहायला मिळाले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यान भोजनासाठी येणार धान्य निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलंय. शाळेत ठेकेदाराकडूनच धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं जातं असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. पालघर मधील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 2377 शाळांना साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडून धान्य पुरवठा होतो. चालू शैक्षणिक वर्षाचं धान्य पुरवठा करण्याचा ठेका साई मार्केटिंग ट्रेडिंग कंपनी जळगाव यांच्याकडे आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या कडून कारवाईच आश्वासन देण्यात आले आहे.