पॅराग्लायडिंग जीवावर बेतलं; परदेशी पर्यटकाचा मृत्यू

पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केल्यानंतर अचानक या पर्यटकांचे पॅराशूट झाडांवर जाऊन आदळले

Updated: Feb 13, 2019, 02:01 PM IST
पॅराग्लायडिंग जीवावर बेतलं; परदेशी पर्यटकाचा मृत्यू  title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करताना एका परदेशी पर्यटकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. पॅराग्लायडिंग करताना झाडावर धडकल्यामुळे या पर्यटकाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. सॅन टेक ओ असं या परदेशी पर्यटकाचं नाव आहे. सॅन टेक ओ हा मूळचा कोरियाचा आहे. भारतात दाखल झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसह तो मुंबईतून पाच दिवसांसाठी फिरण्यासाठी वाईमध्ये आला होता. 

वाईनजिक खाजगी पद्धतीनं पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवला जातो. मंगळवारी सायंकाळी ४ वाजल्याच्या सुमारास सॅनही त्याच्या मित्रांसोबत पॅराग्लायडिंग करण्यासाठी दाखल झाला होता. यावेळी जवळपास १२० लोक पॅराग्लायडिंगसाठी जमले होते. त्यांच्यासोबत पाचगणीच्या टेकड्यांवरून सॅननंही पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण केलं... परंतु, त्यानंतर तो अचानक नाहीसा झाला. बेपत्ता असलेल्या सॅनचा शोध त्याच्या मित्रांनी स्थानिकांसोबत घेतला. रात्री उशिरा अभेपुरी गावाजवळच्या टेकडीवर सॅनचं प्रेत सापडलं.

अभेपुरी गावच्या हद्दीत असताना अचानक सॅनचं तेजीत असलेलं पॅराशूट झाडांवर जाऊन आदळलं... आणि त्यात सॅन टेक ओ याचा मृत्यू झालाय. उपस्थितांनी त्याला तातडीनं वाई मिशन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 

रात्री पोस्टमॉर्टेम शक्य नसल्यानं जिल्ह्यातील वाई हॉस्पीटलमध्ये आज सकाळी सॅनच्या मृतदेहाचं शवविच्छेदन पार पडलं. बुधवारी सकाळी मृतदेह सहकाऱ्यांकडे सोपवण्यात आला. त्यानंतर आज दुपारी सॅनच्या मृतदेहावर वाई इथंच त्याच्या सहकाऱ्यांनी स्थानिक रहिवासी आणि पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडला.

या घटनेसंदर्भात वाई पोलिसांनी कोरियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली आहे. सॅनच्या मित्रांना इंग्रजी किंवा स्थानिक भाषांची ओळख नाही... परंतु, त्यांच्या हावभावावरून या घटनेचा त्यांना चांगलाच धक्का बसल्याचं जाणवतंय.