मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांच्यात गुप्त भेट झाली. या भेटीमुळे रादकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

Updated: Feb 15, 2024, 08:11 PM IST
मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट  title=

Maharashtra Politics : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. यानंतर आता   महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट समोर आहे. भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधून मधून बातम्या येत असतात. मात्र, आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन सर्वानाच धक्का दिला. या भेटीचा तपशील समजला नसून वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे.

शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला खासदार भावना गवळी गैरहजर

यवतमाळच्या नेर येथे शिवसेनेचा जिल्हा पदाधिकारी मेळावा व पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात आयोजित या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पदाधिकारी मेळाव्याला संजय राठोड यांच्या पक्षांतर्गत विरोधक खासदार भावना गवळी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. तसेच नेर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा गट देखील अनुपस्थित होता त्यामुळेच राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन माजी नगरसेवकांना संजय राठोड यांनी गळाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. यावेळी संजय राठोड यांनी एका पर्यटनस्थळासाठी साडे सातशे कोटी रुपयांचा डल्ला आणला, विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्हा दौरा रद्द       

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा  धाराशिव जिल्ह्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 16 आणि 17 असा दोन दिवसाचा ठाकरे यांचा धाराशिव जिल्हा दौरा होता. उद्या उमरगा येथे त्यांची सभा होती तर सायंकाळी ते आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन धाराशिव मध्ये मुक्कामी येणार होते. त्यानंतर कळंब ,भूम अशा त्यांच्या दोन सभा होत्या. मात्र सध्या धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन हिंसक वळणावर आहे या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केल्याचे समजते.