कोल्हापुरात प्रेक्षकांकडून 'तान्हाजी' सिनेमाचं तिकीट दाखवून मिसळ, मटणावर ताव

 अभिनेता अजय देवगन यांनी साकारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा सिनेमा कोल्हापुरात चांगलाच हिट ठरतोय.

Updated: Jan 15, 2020, 08:48 PM IST
कोल्हापुरात प्रेक्षकांकडून 'तान्हाजी' सिनेमाचं तिकीट दाखवून मिसळ, मटणावर ताव title=

कोल्हापूर : अभिनेता अजय देवगन यांनी साकारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा सिनेमा कोल्हापुरात चांगलाच हिट ठरतोय. हा सिनेमा पाहिल्यावर तिकीट दाखवा आणि ऑफर मिळवा अशा ऑफर्स प्रेक्षकांना दिल्या जात आहेत. यात कोल्हापुरात मिसळ आणि मटण थाळीवर सर्वाधिक ऑफर्स आहेत. शिवाजी महाराजांचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची कहाणी कोल्हापूरकरांना मनापासून आवडलीय. मोबाईल ट्यूनपासून मोबाईलच्या गाण्यांच्या गॅलरीत सर्वाधिक ऐकली जाणारी गाणी तान्हाजी सिनेमाचीच असल्याचं कानावर येत आहे.

यात खवय्येगिरीत टॉपवर असलेल्या कोल्हापुरात मिसळ आणि मटणावर तान्हाजी सिनेमाचं तिकीट दाखवून कोल्हापूरकर ताव मारत आहेत. पहिल्यांदाच कोल्हापूरकरांनी हा सिनेमा एवढा डोक्यावर घेतला आहे की, छोट्या छोट्या हॉटेल मालकांनीही ऑफर सुरू केल्या आहेत.

जेवणावर आणि मिसळीवर सूट देऊ, पण तान्हाजींच्या पराक्रमाची गाथा सांगणारा चित्रपट एकदा तरी सिनेमागृहात जाऊन पाहा अशी यामागची तळमळ असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेकांना या ऑफर्स म्हणजे सिनेमाचं प्रमोशन वाटू शकतं. पण हॉटेल चालकांनी उस्फूर्तपणे या ऑफर्स सुरू केल्या आहेत.