महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कुलकर्णी हत्याकांडाचा अखेर निकाल; 'कर्ज' चित्रपटाप्रमाणे संकेतला कारखाली चिरडले होते

Sanket Kulkarni Murder Case: संकेत कुलकर्णी हत्याकांडाचा अखेर निकाल लागला आहे. कोर्टाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: May 31, 2023, 03:40 PM IST
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कुलकर्णी हत्याकांडाचा अखेर निकाल; 'कर्ज' चित्रपटाप्रमाणे संकेतला कारखाली चिरडले होते title=
sentenced to life imprisonment to accused in kulkarni murder case

विशाल करोले, झी मीडिया

Sanket Kulkarni Murder Case: छत्रपती संभाजीनगरला हादरवून टाकणाऱ्या आणि 2018 साली गाजलेल्या संकेत कुलकर्णी खून (Sanket Kulkarni Murder) खटल्याचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मुख्य आरोपी संकेत जयभाय याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल 5 वर्ष हा खटला चालल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीशांनी (Court) हा निकाल दिला आहे.

कर्ज चित्रपटाप्रमाणे केला खून

संकेत कुलकर्णी आणि आरोपी संकेत जायभाय हे दोघे मित्र होते. त्यात संकेत कुलकर्णी जायभायेच्या मैत्रिणींशी बोलतो असा त्याला याला संशय होता आणि त्यातूनच तो संकेतला जाब विचारण्यासाठी गेला. मात्र, या गोष्टीवरुन त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि रागाच्या भरात जायभाय यांने संकेत कुलकर्णीचा खून केला. 
धक्कादायक म्हणजे 'कर्ज' चित्रपटात ज्या पद्धतीने नायकाचा खून होतो अगदी त्याच पद्धतीने हा खून करण्यात आला होता.संकेत कुलकर्णीला पहिले गाडीने धडक देण्यात आली आणि त्यानंतर त्याचा जीव जाईपर्यंत त्याला गाडीने चिरडण्यात आलं. त्यावेळी हा खटला प्रचंड गाजला होता भर दिवसा अशा पद्धतीची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती.

वकिल उज्वल निकम यांची नियुक्ती

 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात मृत मुलाकडून वकिल उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. दरम्यान संकेत कुलकर्णीच्या वडिलांनीही न्याय मिळाला असल्याचे समाधान यावेळी व्यक्त केले आहे.

काय आहे घटना?

संकेत कुलकर्णी या 18 वर्षीय मुलाला माझ्या मैत्रिणीला फोन का करतो म्हणून आरोपी संकेत जयभाय याने गाडी खाली चिरडून ठार केले आहे. आरोपी जयभाये वय 22 याने संकेतला कामगार चौकात भेटायला बोलावले होते, त्यात दोघांमध्ये वाद झाला, त्यातून आरोपीने संकेतच्या अंगावर कार घातली. संकेत जखमी झाल्यानंतर आरोपीने  पुन्हा गाडीने त्याला धडक देत त्याला जबर जखमी केले. सतत तीन वेळा त्याने असाच प्रकार केला. यात संकेतला गंभीर दुखापत होऊन त्याचा जीव गेला.  

१२वीत शिकत होता संकेत

घटना घडली तेव्हा संकेत इयत्ता १२वीच्या वर्गात पुण्याला शिकत होता. छत्रपती संभाजीनगरला मावशीकडे राहायला तो आला होता. त्यात जुन्या वादातून जयभाये याने संकेतला भेटायला बोलावले होते. त्यातूनच हा खून करण्यात आला. त्यावेळी संकेतचे 2 मित्रही यात जबर जखमी झाले होते.