शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल! माजी खासदाराला दिली ही मोठी ऑफर

आधी पक्षातून हकालपट्टीचं वृत्त, मग सारवासारव, आता दिली ही ऑफर

Updated: Jul 7, 2022, 01:22 PM IST
शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल! माजी खासदाराला दिली ही मोठी ऑफर  title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, शिरूर : शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना शिवसेनेकडून (Shivsena) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली असून आता आढळराव पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या वृत्ताने अस्वस्थ झालेले आढळराव-पाटील यांना पुन्हा पक्षात हि घेण्यात आलं. या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील भेटीसाठी बोलावलं होतं आणि या भेटीत आढळराव पाटील यांना ही ऑफर दिल्याचं बोललं जातंय.

पुणे लोकसभेची जागा सध्या काँग्रेस लढवत असून महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असेल तर काँग्रेस पुण्याची हि जागा शिवसेनेला देणार का हे पाहणे हि तितकेच महत्वाचे असेल. जर आढळराव-पाटील पुण्यातून लोकसभा निवडणूक लढले तर शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेना कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडेही लक्ष असेल.

गेली 15 वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजय मिळवला आहे. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आढळराव-पाटील पुण्याची ही ऑफर स्वीकारणार का आणि आढळराव-पाटील पुढच्या काळात काय निर्णय घेणार हे पाहणं हि महत्त्वाचं असणार आहे.