भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता

भुजबळ शिवसेनेत येणार का याकडे लक्ष...

Updated: Aug 22, 2019, 06:09 PM IST
भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांमुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता title=

किरण ताजणे, झी मीडिया, मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. उद्धव ठाकरेंनीही योग्य वेळी उत्तर देऊ, असं म्हटल्यामुळे याला बळकटी मिळते आहे. मात्र या बातमीमुळे नाशिकमध्ये शिवसेनेत अस्वस्थता दिसते आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असताना त्यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचंही बोललं जातं आहे. येत्या काही दिवसांत भुजबळ पुत्र पंकज आणि पुतण्या समीर यांच्यासह स्वगृही येतील असं बोललं जातं आहे. मात्र यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

निष्ठावंत शिवसैनिकांची एक बैठकही लवकरच पार पडणार आहे. अर्थात भुजबळांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला उघडपणे सध्यातरी कुणी विरोध करत नाही आहे. तर नाशिक जिल्ह्यातील समर्थकांनी भुजबळांचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असं म्हटलंय. काहींना तर भुजबळांनी राष्ट्रवादी सोडावी, असंही वाटू लागलं आहे.

स्थानिक शिवसेना नेते आणि भुजबळांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असली तरी यामुळे दोघांचाही फायदा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 

छगन भुजबळ हे शिवसेनेतील पहिले बंडखोर नेते आहेत. त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याची हिंमत दाखवली होती. यामुळे शिवसैनिकांचा भुजबळांवर राग आहे. स्थानिक पातळीवर या संघर्षाची धार अधिक तीव्र आहे. त्यामुळेच उघडपणे कुणी बोलत नसलं तरी एवढी वर्ष निष्ठेनं काम केलं आणि संघर्ष केला, त्याचं काय, असा सवाल शिवसैनिक दबक्या आवाजात विचारत आहेत.

दुसरीकडे काही शिवसैनिक भुजबळांच्या स्वागतासाठीही उत्सुक असल्याचं दिसतं आहे. मात्र भुजबळांनी पुन्हा शिवबंधन बांधलंच तर नाशिक जिल्ह्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात बदलणार आहे, हे मात्र नक्की.