उल्हासनगरात स्थायी सभापतीपदासाठी शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने

सभापतीपदाची निवडणूक बुधवारी होणार असून यासाठी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

Updated: Jun 15, 2021, 03:13 PM IST
उल्हासनगरात स्थायी सभापतीपदासाठी शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने title=

चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्या बुधवारी ही निवडणूक होणार असून यासाठी शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. तर ४ प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूकही जाहीर झाली असून त्यात टीम ओमी कलानी महाविकास आघाडीच्या सोबत आहे.

संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपचं पारडं जड

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भाजपकडून दीपक उर्फ टोनी सिरवानी आणि शिवसेनेकडून कलवंतसिंग सोहता यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र १६ सदस्यांच्या स्थायी समितीत भाजपचे ८, रिपाई १, शिवसेनेचे ५, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचा प्रत्येकी १ सदस्य  असे 7 सदस्य आहेत. त्यातच भाजप आणि रिपाई एकत्र आल्यामुळे यंदा भाजपचाच सभापती होणार हे निश्चित आहे. 

मागील निवडणुकीत समसमान संख्याबळ असताना शिवसेनेनं भाजपच्या एका सदस्याला फोडून थेट सभापती केलं होतं. त्यामुळे यंदा फोडाफोडी होऊ नये, यासाठी भाजपनं आपले सदस्य अज्ञात स्थळी रवाना केले आहेत. दुसरीकडे ४ प्रभाग समित्यांसाठी भाजपतर्फे अनुक्रमे मीना कौर लबाना, महेश सुखरामानी, रवी जग्यासी आणि राष्ट्रवादीच्या बंडखोर सुमन सचदेव यांनी अर्ज भरले आहेत. 

तर महाविकास आघाडीकडून हरेश जग्यासी आणि अंजना म्हस्के, छाया चक्रवर्ती, दीप्ती दुधानी, विकास पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीये. मात्र खरी रंगत स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीत असून उद्याच्या निवडणुकीत शिवसेना काही नवीन खेळी खेळते? की भाजपचाच सभापती होतो? याकडे उल्हासनगरवासीयांचं लक्ष लागलं आहे.