सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला

गेलं वर्षभर राजकीय राड्यांनी विश्रांती घेतल्यानंतर काल पुन्हा एकाद कणकवलीत राडा पाहिला मिळाला.  हमरी तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण यांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं

Updated: Jan 25, 2023, 09:19 PM IST
सिंधुदुर्गात पुन्हा राडा, भाजप-ठाकरे गटात हाणामारी... कोकणात पोलीस बंदोबस्त वाढवला title=

उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग :  राजकीय राडे आणि सिंधुदुर्ग (Sindhudurga) हे तसं जुन नातं. गेले वर्षभर राजकीय राड्यांनी विश्रांती घेतली होती. मात्र काल पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कणकवलीत (Kankavli) राडा पाहायला मिळाला. एका शुल्लक कारणावरून भाजप(BJP) आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे (SSUBT) कार्यकर्ते आमने सामने आले. हमरी तुमरी, शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण याने काल पुन्हा एकदा कणकवली चर्चत आली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) ही रस्त्यावर उतरले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वैभव नाईक यांच्या शिवसेनेच्या 25 ते 30 जणांवर आणि भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने
कणकवली तालुक्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत (Sandesh Sawant) आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये कनेडी इथं जोरदार राडा झाला.  गोट्या सावंत यांनी सेनेच्या  एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी सेनेचे कार्यकर्ते सावंत यांच्या पक्ष कार्यालयात घुसले. यावेळी कार्यालयात एकमेकांना धक्काबुक्की देखील झाली. घटनेची माहिती मिळताच दोन्ही बाजूने कार्यकर्ते या कार्यालय परिसरात गोळा झाले. तसंच पोलिस पथकासह राज्य राखीव पोलीस पथक आणि शीघ्र कृतीदल घटनास्थळी दाखल झाले.

वैभव नाईक उतरले रस्त्यावर
या राड्यात कुंभवडे गावचे शिवसेनेचे माजी सरपंच सूर्यकांत तावडे जखमी झाले. तर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याने भाजपचे कार्यकर्ते संतापून शिवसेनेच्या कार्यालयावर चालून गेले. पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखलं पण कार्यकर्ते सेनेच्या कार्यलयाबाहेरच बराचवेळ उभे राहिले. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक रस्त्यावर उतरले. शिव्या देणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर दांडा घेऊन धावून गेले .पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्यांना रोखले त्यामुळे पुढचा मोठा राडा टळला.

परस्पर विरोधी गुन्हे दाखल
या संपुर्ण राडा प्रकरणात शिवसेने सह भाजपा कार्यकर्त्यानी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.  संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. बेकायदेशीर जमावं तसेच भादवि कलम 307 392 504 507 323 324 नुसार कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेनिकांच्या फिर्यादीनुसार भाजपच्या संदेश सावंत यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी यावर बोलताना कोणाची ही दादागिरी खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.

कनेडीत तणावपूर्ण शांतता
कालच्या राड्यानंतर कनेडीत शांतता आहे मात्र ही तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी  नियंत्रण ठेवण्यासाठी दंगल नियंत्रण पथकासह चोख बंदोबस्त तैनात केला आहे.हा राडा सध्यातरी थांबला असला तरी याचे पडसाद भविष्यात उमटणार नाहीत याची काळजी कार्यकर्त्यांच्या नेत्यांबरोबरच पोलिसांना ही घ्यावी लागणार आहे.