बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक

Nagpur Crime News : नागपूर विमानतळावर शारजाहून आलेल्या एका व्यक्तीकडून तब्बल 50 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने बनियान आणि पॅन्टमध्ये हे सोने लपवून आणलं होतं.

आकाश नेटके | Updated: Feb 24, 2024, 03:24 PM IST
बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध विमानतळांवर सोने तस्करीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशातच नागपूर विमानतळावर देखील तब्बल 50 लाखांचे सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाला संशय आल्यानंतर झाडाझडती घेतली असता हा सगळा प्रकार समोर आला आहे. आरोपीने हे सोने पेस्ट स्वरुपात आणल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शारजा वरून येणाऱ्या विमानातून पॅन्ट आणि बनियानमध्ये पेस्ट स्वरूपात सोने लपवून सोन्याची तस्करी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम युनिटच्या पथकाने कारवाई करत सोनं ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी 822 ग्रॅम सोने, 5 आयफोन, 7 अँपल स्मार्ट वॉच आणि केसर असा तब्बल 77 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मोहम्मद मोगर अब्बास असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला संशय आल्याने अब्बासची झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट आणि बनियामध्ये 50 लाख रुपये किमतीचे सोनं असल्याचे आढळून आले. हे सोने त्याने पेस्ट स्वरूपात पॅन्ट आणि बनियनमध्ये लपवले होते. यावेळी त्याच्याकडे 5.92 लाख रुपयांचे सोने, 5 आयफोन, 7 स्मार्ट वाच, आणि 8 किलो केसर जप्त करण्यात आलं आहे.

मोहम्मद मोगर अब्बास हा एअर अरेबिया फ्लाइट क्रमांक जी9-415 ने शारजाहून नागपूर विमानतळावर आला होता. गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शारजाहून आलेल्या मोहम्मदची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे 50 लाख 75 हजार रुपये किंमतीचे 822.550 ग्रॅम सोने सापडले. त्यानंतर मोहम्मदला अटक करण्यात आली. ही कारवाई सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार आणि सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावरुन विविध कारवायांमध्ये आठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. याशिवाय पाच आयफोनही सीमाशुल्क विभागाने जप्त केले होते. याशिवाय सीमाशुल्क विभागाने बुकेनियातून आलेल्या एका महिलेला 2169 ग्रॅम सोन्यासह अटक केली होती.