मुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच

मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.

Updated: Apr 13, 2024, 09:56 PM IST
मुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर  कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच  title=

Lok Sabha Election 2024 : देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना मुंबईत मात्र उमेदवार ठरवताना मुंबईत दोन्ही आघाड्यांची दमछाक होतेय. 
उत्तर मध्य मुंबईत महायुती आणि मविआला अजून उमेदवार ठरवता आलेला नाही. तर उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेच्या शिंदे गटाची आणि उत्तर मुंबईत काँग्रेसची उमेदवार शोधताना दमछाक होतेय. दक्षिण मुंबई भाजप की शिवसेनेची याचाच घोळ सुरू आहे. 

दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनच्या राहुल शेवाळेंसमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनिल देसाईंना उमेदवारी देण्यात आलीय.  तर उत्तर पूर्व मुंबईतून भाजपच्या मिहिर कोटेचांना तिकीट देण्यात आलंय. त्यांच्यासमोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांचं आव्हान आहे.. मात्र अजून दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मुंबईचा तिढा कायम आहे. या जागांवरची उमेदवारांची लढाई अजूनही निश्चित होणं बाकी आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीला या चार जागांवर उमेदवार ठरवताना अडचण येतेय. उत्तर मध्य मुंबईत तर ना महायुतीने उमेदवार जाहीर केलाय ना महाविकास आघाडीने.  उत्तर मध्य मुंबईत विद्यमान खासदार आहेत भाजपच्या पूनम महाजन.. मात्र त्यांच्या नावावर भाजपने जवळपास काट मारलीय. तेव्हा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांची इच्छा नसतानाही त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते.. मात्र त्यांचं नाव जाहीर केलेलं नाही.. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही उमेदवार जाहीर केलेला नाही.. 

 काँग्रेसकडून सुरूवातीला अभिनेता राज बब्बर यांचं नाव चर्चेत होतं. आता भाई जगताप, नसिम खान यांची नावं चर्चेत असली तरी दक्षिण मध्य ठाकरे गटाकडे गेल्यानं मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही इथून प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

मविआत उत्तर मुंबई मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला असला तरी तिथं काँग्रेसकडे तुल्यबळ उमेदवार नाहीय. त्यामुळंच काँग्रेस तिथं ठाकरे गटाच्या विनोद घोसाळकरांना पक्षात येण्याची ऑफर देतंय. मात्र घोसाळकरांनी काँग्रेसच्या पंजावर लढण्यास नकार दिलाय.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी आपल्या मुलाविरोधात लढण्यास नकार दिलाय. तेव्हा आता तिथं आमदार रविंद्र वायकरांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांकडूनत विरोध होतोय. तर महायुतीत दक्षिण मुंबई नेमका कुणाकडे जाणार हेच समजेना. 

 

सुरूवातीला भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी तयारीही सुरू केली होती.परंतु त्यांना थांबण्यास सांगितल्याची माहिती मिळतंय. तर सध्या येथून मंत्री मंगलप्रभात लोढांचे नावही चर्चेत आहे .  राज्यासह देशात प्रचाराची रणधुमाळी ऐन जोरात आहे.. पहिल्या टप्प्यातलं मतदानही आता पार पडेल.. असं असताना आर्थिक राजधानी मुंबईत मात्र चार मतदारसंघात उमेदवारांची लढाई निश्चित होत नाहीए.