दारूबंदीची मागणी करणाऱ्यांनी आधी 'हे' जाणून घ्या- वडेट्टीवार

सर्वत्र फसलेली दारूबंदी यवतमाळ मध्ये करायची का? असा प्रश्न राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Updated: Feb 9, 2020, 10:45 AM IST
दारूबंदीची मागणी करणाऱ्यांनी आधी 'हे' जाणून घ्या- वडेट्टीवार  title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : सर्वत्र फसलेली दारूबंदी यवतमाळ मध्ये करायची का? असा प्रश्न राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात ज्या राज्यांमध्ये दारूबंदी झाली ती यशस्वी झाली नाही. चंद्रपूरमध्ये देखील दारूबंदी पूर्णतः फसल्याचे ते म्हणाले. दारूबंदीची मागणी करणाऱ्यांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचे आवाहन केले. 

दारू महाग झाली तर एकतरी मोर्चा निघतो का? उलट दारूबंदीसाठी मोर्चे काढणारे पानठेल्यामागे जाऊन दारू पितात असा आरोप देखील त्यांनी केला.  चंद्रपुरात दारूबंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. चोरट्या मार्गाने दारूविक्री वाढली, ड्रग्सचे व्यसन वाढले, बनावट दारू मिळू लागली, पोलिसांचा फायदा झाला, ताडोबाचे पर्यटन प्रभावित झाल्याचे ते म्हणाले.

विदेशी आणि हौशी पर्यटक ताडोबा सफारी करून परत नागपूरला जाऊन मजा करतात. त्यामुळे चंद्रपूरचा हॉटेल व रिसॉर्ट व्यवसाय मोडकळीस निघाला. अश्य्या समस्याचा पाढा वडेट्टीवार यांनी मांडला. 

दारूबंदी करायचीच असेल तर अख्या महाराष्ट्रात दारूबंदी करून राज्याच्या सीमा सील करा. खरं तर दारूमुळे राज्याला १७ हजार कोटींचा महसूल मिळतो, त्यातून खर्च भागतो. हा महसूल बुडाला तर शेतकऱ्यांना मदत कशी करायची? महागाई वाढेल, दारूबंदी झाली तर हा खर्च इतर कराच्या माध्यमातून जनतेच्या खिशातूनच काढावा लागेल असे वडेट्टीवार म्हणाले. 

एकतर ज्या खबऱ्यांच्या माहितीवरून दारू पकडली जाते त्या दारूचा लिलाव करून त्या रकमेचे बक्षिस खबऱ्यांना दिले पाहिजे, अशी आपली योजना असल्याचे सांगून, पर्यटन स्थळावरील रिसॉर्टवर दारूचे परमीट देण्याची आपली मागणी रेटून धरणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दारूबंदी हा उपाय नसून समाजप्रबोधन करून दारूचे दुष्परिणाम सांगितले पाहिजे असे मत ना. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.