जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई

Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Updated: Dec 22, 2022, 05:21 PM IST
जयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई title=
जयंत पाटील (फोटो सौजन्य - PTI)

Maharashtra Winter Session 2022 : 'अध्यक्ष तुम्ही निर्लज्जपणा करु नका' असं विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केले होते. यानंतर सभागृहात एकच गदारोळ सुरु झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतर आता जयंत पाटील यांच्यावर नागपूर अधिवेशनापर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

नेमकं काय झालं?

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणाचा मुद्दा अधिवेशनातही गाजला. या मुद्दयावर आमदार भास्कर जाधव यांना बोलू द्यावं अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यास नकार दिला. त्यावेळी जयंत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांना उद्देशून तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका असे विधान केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेते पुरवणी मागण्यांवर भाषण करतील असे म्हणताच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी हरकतीचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही चौथ्यांदा सभागृह तहकूब केले असेही विरोधकांनी म्हटले. यावेळी जयंत पाटील यांनी हे बरोबर नाही, तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, असे म्हटले.

जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

"जो प्रश्न संपलेला आहे त्या विषयाबद्दल सत्ता पक्षाचे लोक नको ती विधाने करतात, बोलतात. सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नाही. भास्कर जाधवांना संधी दिली जात नव्हती. वेलमध्ये येवून आमदार सांगत होते की बोलू द्या. मी आवाहन केले की निर्लज्जपणासारखे वागू नका. मी माईक चालू नसताना बोललो होतो. हे सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी मुख्यमंत्री कसे शब्द वापरत होते ते पाहिले असेल. 32 वर्षात मी कोणताही अपशब्द वापरलेला नाही. सरकारला बोललेलो ते अध्यक्षांना चिकटवले गेले. माझा कोणाचाही अवमान करण्याचा उद्देश नव्हता," असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.

अजित पवार यांची दिलगिरी

"मी अनेक वर्षांपासून काम करतो आहे. अशा प्रकारचे वक्तव्य अजानतेपणानेही कोणाकडून होऊ नये या मताचे आम्ही आहोत. यातून मार्ग निघावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली. निलंबनाचा ठराव बहुमताने केला त्याला मला विरोध करायचा नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी जयंत पाटील यांच्याकडून जे काही घडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो," असे अजित पवार यांनी म्हटले.