ही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक

Swabhimani Shetkari Sanghatna: सोलापुरातील (Solapur) शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) ही बाब उघड केली असून, राज्य सरकारलाही (Maharashtra Government) संतप्त सवाल विचारला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला बिलाचा फोटोही शेअर केला आहे.   

Updated: Feb 22, 2023, 06:27 PM IST
ही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक title=

Swabhimani Shetkari Andolan: शेतकऱ्याने 512 किलो कांदा विकल्यानंतर त्याला व्यापाऱ्याने फक्त दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोलापुरात (Solapur) हा प्रकार घडला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) यांनी ही बाब समोर आणली आहे. व्यापाऱ्याने शेतकऱ्याला फक्त दोन रुपयांचा चेक दिला नाही, तर पुढील 15 दिवसानंतर तो वठणार असं सांगितल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. असल्या प्रकाराबद्दल राज्यकर्त्यांनी जरा तरी लाज बाळगावी असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
 
राजेंद्र तुकाराम चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून त्याने 10 पोती कांदा विकला होता. 500 किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती 512 रुपये येणं अपेक्षित होतं. मात्र 509 रुपयांचा  खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत. या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि 15 दिवसांनी वठेल असं सांगितलं. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. 

राजू शेट्टींचं ट्वीट

"राज्यकर्त्यांनो जरा तरी लाज बाळगा. शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे तुम्हीच सांगा. एका बाजूला थकबाकी पोटी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन धडाधडा तोडता आणि डोळ्यासमोर पीक करपून जाते. राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर बाजार समितीत 10 पोती कांदे विकल्यावर त्याला किती पैसे आले ..ते बघा.. निर्लज्ज व्यापाऱ्याला दोन रुपयांचा चेक देताना लाज कशी वाटली नाही. व्यापारी शेतकऱ्याला सांगतो 15 दिवसाने हा चेक वटेल," असं ट्वीट राजू शेट्टी यांनी केलं आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूरच्या राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने 512 किलो कांदा व्यापाऱ्याला विकला. 1 रुपया दराने त्याला 512 रुपये मिळणं अपेक्षित होतं. पण राजू शेट्टी यांनी बिलाचा फोटो टाकला असून त्यात लिहिण्यात आलं आहे, त्यानुसार भाडे, हमाली, तोलाई आदींसाठीचे 509 रुपये कापून घेण्यात आले. त्यातून शिल्लक असलेली 2.49 रुपयांची रक्कम देण्यासाठी व्यापाऱ्याने राजेंद्र चव्हाण यांना केवळ 2 रुपयांचा चेक देण्यात आला.