अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार; दोन महिन्यात अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश

अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार आहे. मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टाकडून आयुक्तांची नेमणूक करत दोन महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Updated: Feb 26, 2024, 09:13 PM IST
अंबाबाई मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार; दोन महिन्यात अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश title=

Kolhapur Ambabai : अंबाबाई देवीच्या मूर्तीची सद्यस्थिती लवकरच समोर येणार आहे. मूर्तीची पाहणी करण्यासाठी कोर्टानं आयुक्तांची नेमणूक केलीय. दोन महिन्यात मूर्तीच्या सध्यस्थीतीचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  पुरातत्व विभागाच्या विलास मांगीराज आणि आर.एस.त्र्यंबके यांची न्यायालयीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. मूर्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पावलं उचलत नसल्याच्या आरोपावरून याचिका दाखल आहे. त्यावरूनच दिवाणी कोर्टानं आदेश दिले आहेत. 

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची मूर्ती नाजूक असल्याची सर्वप्रथम बातमी झी 24 तास ने दिली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी केली होती, पण त्या संदर्भातला अहवाल अजून पर्यंत गुलदस्त्यात ठेवण्यात आला होता. पण, अखेर जिल्हा सत्र न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश देत असताना कोर्टाने आयुक्त नेमत दोन महिन्यात मूर्तीच्या सध्यस्थीतीचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.. त्यामुळे अंबाबाई देवीच्या मूर्ती संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोर्टाने पुरातत्व विभागाचे विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके यांची न आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. या दोघांचाही अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेत सहभाग होता.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मूर्तीच्या जीर्णत्वाविषयी अनेकदा अनेक चर्चा होत असतात अशा परिस्थितीमध्ये मूर्तीची नाजुक अवस्था लक्षात घेता मूर्तीचे तातडीने संवर्धन करावे अन्यथा पुरातत्त्व खात्याच्या निवृत्त तज्ञांकडून मूर्तीचे संवर्धन करून घेण्यास परवानगी मिळावी अशा मागणीचा दावा गजानन विश्वनाथ मुनीश्वर यांनी कोल्हापूर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे 2022 साली दाखल केला आहे. या दाव्यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती बरोबरच जिल्हा प्रशासन राज्य पुरातत्व विभाग केंद्रीय पुरातत्व विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याशिवाय ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर व सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई हे प्रतिवादी म्हणून हजर झाले आहेत.

या कामी सर्व प्रतिवादींना नोटीस लागू झाल्याने जिल्हा प्रशासन व देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने दाव्यासाठी कैफियत व प्रत्येक अर्जावर म्हणणे दाखल करण्यात आले. याच कामी मूर्तीची अवस्था आज नेमकी काय आहे हे ठरवण्यासाठी तज्ञ लोकांना पाहणीसाठी नेमावे अशा आशयाचा अर्ज दाव्यातील वादी गजानन मुनीश्वर यांनी 21 मार्च 2023 मध्ये अर्ज दिला होता यावर आदेश करताना. विलास मांगीराज व आर एस त्र्यंबके या पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून तिच्या सध्या परिस्थितीबद्दल व संभाव्य उपाययोजनाबद्दल न्यायालयाला अहवाल सादर करावा असा आदेश न्यायालयाने पारित केला आहे.