मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास

आक्रमक आणि अभ्यासू नेता अशी ओळख असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे

Updated: Jul 23, 2021, 08:59 PM IST
मॉडेल, मुख्यमंत्री ते सक्षम विरोधी पक्ष नेते, देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास title=

अभ्यासू वृत्ती, कुशल वक्ते, विविध विषयांचा व्यासंग असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटणवारे युवा राजकारणी म्हणजे देवेंद्र फडणवीस. नगरसेवक ते कमी वयातील महापौर, आमदार ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री असा यशस्वी टप्पा गाठणारे देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्षनेते म्हणून देखील सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास

देवेंद्र फडणवीस यांना वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. विद्यार्थी दशेपासूनच अभ्यासू वृत्ती आणि प्रामाणिक राहून झोकून देऊन काम करण्याची पोचपावती म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकलं. वयाच्या 27व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यानंतर केवळ दोनच वर्षांनी म्हणजे 1999 मध्ये फडणवीस विधानसभेवर निवडून आले. विधानसभेवर गेल्यानंतर फडणवीस यांच्या राजकीय कर्तृत्वाला खऱ्या अर्थाने झळाळी आली. सामाजिक असो कि लोकहिताचे प्रश्न असो, फडणवीस यांनी सरकारला जेरीस आणलं. त्यामुळेच त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा मानही मिळाला. 

पंतप्रधान मोदींनी दिले होते संकेत

आपल्या कामाच्या जोरावर अल्पावधीतच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपचे महत्त्वाचे नेते बनले. 2014 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर इथे झालेल्या प्रचारसभेत म्हटलं होतं की, 'देवेंद्र देश के लिए नागपूर का तोहफा हैं ' यातून निवडणूक प्रचार दरम्यानच स्पष्ट झालेलं की भाजपची सत्ता आली तर मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे असणार. आणि पंतप्रधान मोदींचं हे वक्तव्य खरंही ठरलं. 

देशातले दुसरे तरुण मुख्यमंत्री

2014च्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालं आणि  देवेंद्र फडणवीस नावाचा युवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून राज्याला मिळाला. देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर, 2014 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ही शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले. “देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र” ही घोषणा 2014 च्या निवडणूकीतली घोषणा प्रत्यक्षात उतरली. वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते दुसरे मुख्यमंत्री ठरले. 

मुख्यमंत्री काळातली कामं

मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी लोकहितांच्या कामांवर जोर दिला. जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, शहराला जोडणारे मेट्रो प्रकल्प फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात हाती घेतले. शिक्षण, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीबाबतच्या आकडेवारीतही फडणवीस यांनी राज्याला नवी ओळख मिळवून दिली. प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी विविध कायदे तयार केले. आपल्या निर्णयक्षमतेच्या जोरावर फडणवीस यांनी प्रशासनावर घट्ट पकड बसवली. 

ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कृषी यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम फडणवीस यांनी केलं. मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी विविध मुद्दे निकाली लावले. तर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी त्यांना धारेवरही धरलं. पण या सर्व टिकेला त्यांनी आपल्या पद्धतीने हाताळलं. 

सक्षम विरोधी पक्षनेते

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीस यांना विरोधीपक्षाच्या बाकावर बसावं लागलं. पण विरोधीपक्षाच्या बाकावरूनही फडणवीस सरकारला धारेवर धरतांना दिसून येत आहेत. फडणवीस विरोधी पक्षनेता या दिलेल्या भूमिकेशी 100 टक्के प्रामाणिक राहून काम करत आहे. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर त्यांनी सरकारला कोंडीत पकडलं. वीजबिलाचे प्रश्न असो की शेतकरी, कामगारांचा मुद्दा असो, शिक्षण, आरोग्य, औद्योगिक अशा सगळ्याच विषयांवर फडणवीस यांनी सरकारला जाब विचारला. कोरोना काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. कोरोना काळातील गैरकामांवर फडणवीस यांनी अधिवेशनात आवाज उठवला. 

अभ्यासू राजकारणी ते मॉडेल

अभ्यासू राजकारणी, उत्तम वक्ते असलेले देवेंद्र फडणवीस हे एक अप्रतिम मॉडेलही होते. राजकारणात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहिरातीसाठी मॉडेलिंग केलं होतं. 2006 मध्ये फोटोग्राफर आणि फडणवीस यांचे मित्र विवेक रानडे यांनी एका दुकानासाठी फडणवीस यांचं फोटोशूट केलं. ही जाहिरात पाहून अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना खास दिल्लीला भेटायला बोलवलं होतं. जेव्हा हि भेट झाली तेव्हा वाजपेयी म्हणाले होते, व्वा ! व्वा! क्या स्मार्ट मॉडेल हे ये… अशी कौतुकाची थाप दिली.