महाकाय लाटांनी गिळले होते 'रामदास',10 वर्षांनी किनाऱ्यावर सापडले होते मुंबईच्या Titanic चे अवशेष

Indias Titanic Tragedy: 112 वर्षांपूर्वी झालेल्या टायटॅनिक दुर्घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तशीच काहीशी दुर्घटना मुंबईच्या समुद्रातही घडली होती. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2023, 03:28 PM IST
महाकाय लाटांनी गिळले होते 'रामदास',10 वर्षांनी किनाऱ्यावर सापडले होते मुंबईच्या Titanic चे अवशेष title=
titanic submarine news indian Titanic Ramdas Ship Tragedy That Killed 700 Also

Ramdas Ship Tragedy: 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले पण भारताला स्वातंत्र्य होण्याआधीच महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. देश स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करत असताना मुंबई, रेवास, अलीबाग, नंदगाव, माणगाव आणि परिसरातील लोकांचा आक्रोश थांबत नव्हता. 17 जुलै 1947चा दिवस महाराष्ट्रासाठी काळ बनून आला. त्या दिवशी गटारी अमावस्येचा दिवस होता. सकाळी ८ वाजता मुंबईतील भाऊचा धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी एमएस रामदास (SM Ramdas) निघाली. मात्र, त्याआधीच बोटीला जलसमाधी मिळाली. काय घडलं होतं नेमकं?

एसएम रामदासवर स्थानिकांसह, व्यापारी, मच्छमार अलिबागला जाण्यासाठी निघाले होते. रामदास बोटीने मुंबई बंदरापासून 7.5 किलोमीटर अंतर कापले होते. 8 वाजून ३५ मिनिटे झाले होते. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. बोट वेगाने अंतर कापत होती.  त्याचवेळी सोसाट्याचा वारा आणि उसळलेल्या लाटांमुळं बोट काशाच्या खडकांजवळ  कलली. हळूहळू बोटीत पाणी भरु लागले. बोटीत पाणी भरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरुन सैरावैरा पळू लागले. बोटीत लाइफ जॅकेटची संख्याही कमी होती. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. 

बोटीचा कॅप्टन प्रवाशांना शांत राहण्याची सूचना देत होता तर एकीकडून बोट समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्याचा खटाटोप सुरू होता. त्याचवेळी रामदास जहाज गल्स दीपजवळ पोहोचले होते. त्याचवेळी आलेल्या एका महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडले. कॅप्टनला सावरण्याचा वेळ मिळेपर्यंत पाणीपूर्णपणे जहाजात शिरले होते. ज्यांना पोहता येत होते त्यांनी पटापट समुद्रात उड्या घेतल्या. तर काही जण बोटीतच फसले. साधारण ९च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

रामदास बोट दुर्घटना घडली तेव्हा जहाजात 673 प्रवासी होते. चार अधिकारी, 49 खलाशी आणि हॉटेलचे कर्मचारी होते. तर जहाजात 35 लोक विनातिकीट प्रवास करत होते. साधारणतः मुंबईहून रेवासला पोहोचण्यासाठी १.30 तासांचा अवधी लागतो. मात्र, जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी 5पर्यंत कोणालाही नव्हती. ज्यांना पोहोता येत होतं त्यांनी मुंबईला जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी 625 जण समुद्रात बुडून मरण पावले होते. तर, ६० जणांचे लाइफ जॅकेट व त्यांना पोहता येत असल्याने जीव वाचले होते. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान याचादेखील जीव वाचला होता. 

साधारणत: रेवसला इतके लोक मुंबईहून एका वेळेस कधीच जात नसत. पण 17 जुलै 1947 रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती. रामदास बोटीची त्या वर्षीच नाविक अधिकार्‍यांकडून पाहणी करण्यात आली होती व बोट चांगल्या स्थितीत असल्याचे तिला प्रमाणपत्रही मिळाले होते. सरकारी वर्गवारीत ही बोट 9 व्या प्रतीची होती. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर वाहात आले होते.