ताडोबाच्या जंगलात दिवसभर जिप्सी घेऊन फिरा; मोजावे लागणार इतके पैसे

आता पर्यटन असो वा संशोधन या सर्वांसाठी एक वेगळा व्याघ्रदर्शन पर्याय उपलब्ध झाला आहे. 

Updated: Nov 12, 2022, 07:41 PM IST
ताडोबाच्या जंगलात  दिवसभर जिप्सी घेऊन फिरा; मोजावे लागणार इतके पैसे  title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात(Tadoba-Andhari Tiger Reserve of Chandrapur) आता व्याघ्रदर्शनाची अमर्याद संधी पर्यटांना मिळणार आहे. ताडोबाच्या बाह्य क्षेत्रात आता दिवसभर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. पर्यटकांना 4 व्यक्तींच्या जिप्सीसाठी  45 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यात कॅमेरा शुल्काचा समावेश आहे. 

केंद्र सरकारकडे व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाने यासाठी विशेष प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. ताडोबाच्या बाह्य भागातील देवाडा क्षेत्रातून यासाठी प्रवेश देण्यात येणार असून अडेगाव द्वारातून ही जिप्सी बाहेर पडणार आहे. 
सकाळी सव्वासहा ते संध्याकाळी सव्वासहा असा यासाठीचा कालावधी असणार आहे. ही सोय केवळ आधी नोंदणी व आगाऊ पैसे भरणाऱ्या पर्यटकांनाच मिळणार आहे. 

बाह्य क्षेत्रातील वाघ पाहण्याची संधी

ताडोबा प्रकल्पात सध्या 100 हुन अधिक पूर्ण वाढीचे वाघ आहेत. वाघांची संख्या आणि उपलब्ध जंगल याचे प्रमाण बघता प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रात वाघांचे नैसर्गिक स्थलांतर होते. म्हणूनच बाह्य क्षेत्र देखील हमखास व्याघ्रदर्शनाचे ठरले आहे.  दूरवरून ताडोबात वाघ व अन्य वन्यजीव त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अनेकदा निराश होऊन परतावे लागते.

आता पर्यटन असो वा संशोधन या सर्वांसाठी एक वेगळा व्याघ्रदर्शन पर्याय उपलब्ध झाला आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अधिक पर्यटनस्नेही होण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे.