कोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू झालेय. यामुळे कोकणात जाणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोगद्यामुळे प्रवाशांचा 40 ते 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. 

Updated: Sep 10, 2023, 10:23 PM IST
कोकणात जाणा-यांना गणपती पावला! मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू title=

Mumbai Goa Highway : गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरच्या कशेडी बोगद्यातील वाहतूक अखरे सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 10 सप्टेंबरपासून कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सिंगल लेन सुरू झाला आहे. या बोगद्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. 

कशेडी घाटाला वळसा घालण्याची गरज नाही

पोलादपूर येथील भोगाव पासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी इथं बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. नऊ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे 40 ते 45 मिनिटांचा वळसा वाचणार आहे. सिंगल लेन सुरू झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यना दिलासा मिळालाय.बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येणार आहे.

कोकण प्रवासातील सर्वात अवघड वळणांचा घाट

रायगड आणि रत्नागिरी जिल्हयांना जोडणारा कशेडी घाट अवघड वळणांचा आहे. रस्ता रूंद असला तरी तीव्र उतारांमुळे घाटाचा मार्ग पार करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावरून लहान मोठया सर्वच प्रकारच्या वाहनांची मोठी वर्दळ असते. तळकोकणात जाणारे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करतात. कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरु झाल्यामुळे प्रवाशांची कसरत वाचणार आहे. 

कशेडी घाट म्हटलं की सगळयांच्याच काळजाचा ठोका चुकतो

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट म्हणजे सगळ्यात धोकादायक.  नागमोडी वळणावळणाचा हा तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट.  पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी आणि वारंवार होणारे अपघात यामुळं कशेडी घाट म्हटलं की सगळयांच्याच काळजाचा ठोका चुकतो.  कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार होतोय. 

तासाभराचा घाट 10 मिनिटात पार

सध्या कशेडी घाट पार करायला सुमारे 40 ते 45 मिनीटं लागतात. मात्र बोगद्यामुळे हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात पार पडेल. शिवाय अपघातांचा धोका देखील टळणार आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी

यंदा गणपतीला कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची टोल माफी करण्यात येणारेय. मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतलाय. यामुळे कोकणात जाणाऱ्यांचे आता 600 ते 700 रुपये वाचणार आहेत. मात्र, यासाठी पास काढावा लागणारेय. मुंबई शहरासह ठाणे, पालघर इथल्या नागरिकांना जवळच्या पोलीस स्टेशन आणि आरटीओकडून पास घ्यावे लागणारेय.