बुरशी, कीड लागलेल्या झाडांच्या उपचारासाठी धावतेय 'ट्री ऍम्ब्युलन्स'

 झाडांच्या आजारावर उपचार करण्यासाठी या ट्री ऍम्ब्युलन्सचा वापर 

Updated: Feb 19, 2020, 07:52 AM IST
बुरशी, कीड लागलेल्या झाडांच्या उपचारासाठी धावतेय 'ट्री ऍम्ब्युलन्स' title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : आपण आतापर्यंत मनुष्याच्या किंवा जनावरांच्या आरोग्यासाठी धावणारी ऍम्ब्युलन्स पाहिली असेल. मात्र लातूरच्या एका अवलिया तरुणाने चक्क वृक्षांसाठी 'ट्री ऍम्ब्युलन्स' बनवली आहे. रस्त्या शेजारील झाडं, नागरिकांच्या घरातील झाडं तसेच विविध झाडांच्या संगोपनासाठी आणि त्या झाडांच्या आजारावर उपचार करण्यासाठी या ट्री ऍम्ब्युलन्सचा वापर होतोय. संगमेश्वर बोमणे या ३४ वर्षीय तरुणाने ही अनोखी ट्री ऍम्ब्युलन्स बनवली आहे. बी.एस्सी. हॉर्टिकल्चरचे शिक्षण घेतलेल्या संगमेश्वर हे गेल्या १४ वर्षांपासून वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहेत.

लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागातून त्यांना वृक्षांवर पडलेल्या विविध आजारांबाबत नेमका काय उपाय करावा ? यासाठी फोन येत असत. सततचे येणारे फोन आणि सांगितलेले उपाय हे तोकडे पडू लागल्यामुळे संगमेश्वर बोमणे यांना ट्री ऍम्ब्युलन्सची एक भन्नाट कल्पना सुचली. 

ज्या पद्धतीने मनुष्याना किंवा मुक्या जनावरांना रुग्णालयात नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स असते अगदी तशीच ट्री ऍम्ब्युलन्स बोमणे यांनी दोन महिन्यापूर्वी बनविली. फक्त फरक एवढाच की आजारी असलेल्या अर्थात बुरशी, कीड लागलेल्या झाडांवर त्याच ठिकाणी जाऊन ही ट्री एब्युलन्स उपचार करणार आहे.

यासाठी सर्वप्रथम त्यांनी या छोट्या गाडीची ऍम्ब्युलन्स म्हणून निवड केली. या अँब्युलन्समध्ये खते, मायक्रोन्यूट्रियंट्स, वृक्षांची लागणारी विविध औषधी, विविध औजारे, ब्रश कटर, फवारे, एचटीपी फवारा, ६० फूट उंचीपर्यंत झाडं धुवता येईल अशी मशीन, पाणी आणि मोटार असे साहित्य या ट्री ऍम्ब्युलन्स असतं. 

फेसबुक, व्हाट्सऍपसारख्या विविध सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी या ट्री ऍम्बुलन्सचा नंबर ग्राहकांसाठी उपलबध करून दिला. मुळात लातूर जिल्ह्यात वृक्षांची संख्या ही फक्त ०१ टक्का आहे. वृक्ष संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात महाराष्ट्रात खालून दुसरा नंबर हा लातूरचा त्यामुळे सततचा दुष्काळ हा लातूर जिल्ह्यात पडतो. 

त्यामुळे वृक्षांची संख्या वाढावी, कुठल्याही कीड, रोग किंवा पाण्यावाचून  झाड वाया जाऊ नये म्हणून या ट्री ऍम्ब्युलन्सची निर्मिती केल्याचे संगमेश्वर बोमणे सांगतात. 

एका ऍम्बुलन्स साडे लाखाचा खर्च येतो. अशा दोन ऍम्बुलन्स त्यांनी बनविल्या आहेत. यामुळे खिशाला कात्री लागत असले वृक्ष वाचविण्याचे मोठे समाधान मिळत असल्याचेही ते सांगतात. 

संगमेश्वर बोमणे यांच्या ट्री ऍम्ब्युलन्समुळे अनेक वृक्ष विविध रोगांपासून वाचली असल्याचे येथील नागरिक सांगतात. लातूरसारख्या वृक्ष संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात अशा ट्री अँब्युलन्स या वरदान ठरत असल्याचे लातूरकर नागरिक सांगत आहेत. 

दुष्काळाचे सातत्याने चटके सोसणाऱ्या लातूर जिल्ह्यात वृक्ष संवर्धनासाठी अनेक जण प्रयत्न करतात. मात्र लावलेली वृक्ष टिकावी म्हणून अशा पद्धतीने बहुदा महाराष्ट्रातील या अनोख्या ट्री ऍम्ब्युलन्समुळे लातूर जिल्ह्यातील वृक्ष काही अंशी का होईना निश्चितच जगू शकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय.