बाभळी बंधारा प्रकरणी एका माजी आमदारासह दोन आमदारांना जामीन

 बाभळी बंधारा प्रकरणी २ आमदार आणि एक माजी आमदारांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड आणि १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन

Updated: Sep 21, 2018, 08:18 PM IST
बाभळी बंधारा प्रकरणी एका माजी आमदारासह दोन आमदारांना जामीन title=

नांदेड : बाभळी बंधारा प्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना १५ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश धर्माबाद न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणात एकूण १६ आरोपी आहेत. त्यातले २ आमदार आणि एक माजी आमदार हजर होते. त्यांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड आणि १५ हजाराच्या जातमुचलक्यावर धर्माबाद न्यायालयाने जामीन दिला. 

चंद्राबाबुंच्या वकिलांनी त्यांना हजर राहण्यासाठी मुदत मागितली. त्यामुळे त्यांचं अटक वॉरंट रद्द करुन चंद्राबाबूंसह इतर आरोपींना सुनावणीसाठी १५ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश धर्माबाद न्यायालयानं दिलेत. २०१० साली धर्माबाद इथल्या बाभळी बंधाऱ्याला विरोध करत चंद्राबाबूंनी आंदोलन केलं होतं. 

यावेळी कारागृहात असताना कारागृह अधिकारी आणि पोलिसांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्या प्रकरणी चंद्राबाबू नायडूंसह एकंदर १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१३ पासून धर्माबाद न्यायालयात हा खटला सुरू आहे. मात्र या खटल्याच्या एकाही सुनावणीला न आल्यानं न्यायालयानं चंद्राबाबूंसह इतर आरोपींविरोधात अटक वॉरंट काढलं होतं.