अनेकदा वाहतूक नियमांचं उल्लंघन पण... समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सबाबत धक्कादायक माहिती समोर

Samruddhi Mahamarg Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताबाबत एक धक्कादायकबाब समोर आली आहे.

Updated: Jul 4, 2023, 03:01 PM IST
अनेकदा वाहतूक नियमांचं उल्लंघन पण... समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सबाबत धक्कादायक माहिती समोर  title=
vidarbha bus accident violation of traffic rules multiple times but fine paid online after accident

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर आजवरचा सर्वात भीषण अपघात 1 जुलै 2023 रोजी घडला. या अपघातात 25 प्रवाशांचा बळी गेली. खासगी ट्रॅव्हल्स बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना बुलढाणा येथील सिंदखेडराजानजीक पिंपळखुटा येथे हा अपघात घडला. अपघातानंतर बसने पेट घेतली. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचबरोबर बसबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

विदर्भ ट्रॅव्हल बसचा हा भीषण अपघात झाला त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाला अनेकदा नियमांचे उल्लंघन करूनही परिवहन विभागाने वाहन चालविण्याची खुली सूट दिली असल्याचे उघडकीस आले आहे. 

ट्रॅव्हल्स संचालकांवर यापूर्वी अनेकदा वाहतूक नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारले आहेत. मात्र हा दंड कधीही भरला गेला नाही. मात्र अपघात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच सर्व चालान ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. परिवहन विभागाने हे दुर्लक्षित धोरण अवलंबिण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अपघातग्रस्त बसविरोधात गेल्या दोन वर्षांत आकारलेले दंड

१ अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर 5 फेब्रुवारी 2021 रोजी पीयुसी नसल्याच्या कारणामुळे 1200 रुपयांचा चलान.

२ 24 ऑगस्ट 2022 रोजी फिटनेस प्रमाणपत्र न दाखवणे आणि अयोग्य लाईटचा वापर केल्याप्रकरणी 4 हजार 500 रुपयांचा दंड.

३ 11 ऑक्टोबर 2022 रोजी फिटनेस प्रमाणपत्रचा कालावधी संपल्याप्रकरणी तब्बल 23 हजार 500 रुपये, स्पीड गव्हर्नर योग्यरित्या काम करत नसल्याचे कारण दाखवत 2 हजार रुपये, अग्निशमन सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळं 500 रुपये, आपातकालीन द्वार नीट काम करत नाही म्हणून 2 हजार रुपये असे चलान आकारण्यात आले.

४ जानेवारी 2023 मध्ये ही नो पार्किंगमध्ये बस उभी केल्याप्रकरणी 500 रुपयांचा दंड लागला होता.

५ 12 जून 2023 रोजी 11 हजार 200 रुपयांचे दंड लावण्यात आले होते. तेव्हा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले, वाहन चालकाने योग्य ड्रेस घातले नाही, बसच्या विंडोचे काही काच तुटलेले आहेत तसेच बस ठरलेल्या ठिकाणी न थांबवता प्रवासादरम्यान मध्येच थांबवणे असे कारण होते.

वाहतूक विभागाने आकारलेले हे सर्व चालान विदर्भ ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी अपघात होईपर्यंत भरले नव्हते. तरीही परिवहन विभागाने त्याकडे दुर्लक्ष करीत वाहनाला रस्त्यावरून धावण्यास सूट दिली. त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे बसला अपघात झाल्यानंतर काही तासातच सर्व चालान ऑनलाईन भरण्यात आल्याची नोंद आहे. एक जुलै 2023 रोजी दुपारी 1:15 पासून 1:23 दरम्यान ऑनलाईन भरण्यात आले आहेत.