लॉकडाऊनमध्ये दादरा नगर हवेलीकडे जाण्याचा प्रयत्न जिवावर बेतला

दरोडेखोर असल्याच्या संशयावरून महंतासह तिघांची निर्घृण हत्या

Updated: Apr 17, 2020, 09:24 PM IST
लॉकडाऊनमध्ये दादरा नगर हवेलीकडे जाण्याचा प्रयत्न जिवावर बेतला title=

हर्षद पाटील, पालघर :  सगळीकडे लॉकडाऊन असताना रात्रीच्या वेळी दादरा नगर हवेलीकडे जाण्याचा प्रयत्न मुंबईतील तिघांच्या जीवावर बेतला.  विशेष म्हणजे या तिघांना पोलिसही वाचवू शकले नाहीत.

पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. गेले काही दिवस या अफवांवर विश्वास ठेवून लोक रात्रीची गस्त घालत आहेत. संशयावरून भलत्याच लोकांवर हल्ला करण्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या असून गुरुवारी रात्री तर गावकऱ्यांनी तिघांचा जीव घेतला. धक्कादायक बाब म्हणजे गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला आणि पोलिसांच्या गाडीतच तिघांना दगड, बॅट आणि बांबूने ठेचून तिघांची हत्या केली.

डहाणू परिसरात अफवांचे पेव

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून चोर आणि दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवा पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि परिसरात पसरल्या आहेत. दरोडेखोर दरोडे टाकतात, तसेच काही चोर माणसांनाचही पळवून नेतात आणि किडणी काढून विकतात अशा अनेक अफवा परिसरात पसरल्या आहेत. खरे तर अशी कोणतीही घटना या भागात घडलेली नाही. पण लोकांमध्ये मात्र या अफवांमुळे भीती पसरली आहे. त्यातूनच गावकरी रात्रीची गस्तही घालू लागले आहेत.

लॉकडाऊनमध्ये दादरा नगर हवेलीकडे जाणे जीवावर बेतले

मुंबईत कांदिवलीत राहणारे तिघेजण गुरुवारी दादरा नगर हवेलीकडे जायला निघाले होते. खरे तर लॉकडाऊन असल्याने रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुंबईतून इको कार घेऊन ते निघाले आणि त्र्यंबक रोडने येऊन नंतर सायवन गड चिंचले रस्त्यावरून सुरतकडे चालले होते. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी या तिघांना जबर मारहाण केली.

पोलिसांच्या गाडीतच ठेचून मारले

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच कासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जबर जखमी झालेल्या अवस्थेत तीन प्रवाशांना पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये घातले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गावकऱ्यांनी पोलिसांवरही हल्ला केला. तसेच पोलिसांच्या गाडीतच तिघांना पुन्हा दगड आणि लाकडाने ठेचून मारले. हल्ला इतका तीव्र होता की पोलिसांच्या गाडीत रक्ताचा सडा पडला होता. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. सुशिलगिरी महाराज (वय ३० वर्षे), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय ७० वर्षे) आणि चालक निलेश तेलगडे (वय ३० वर्षे) अशी तिघा मृतांची नावे आहेत. हल्लेखोरांनी प्रवाशांची इको कार आणि पोलिसांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड केली. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ११० हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या घटनेत मृत्यू झालेले तिघेही मयत हे त्रंबकेश्वरचे दक्षिणमुखी आखाड्याशी संबंधित आहेत. आखाड्याचे महंत कल्पवृक्ष बाबा आणि त्यांचे शिष्य मुंबईहून गुजरातमधील व्यारा याठिकाणी जात असताना ही घटना घडली. त्यांच्या गाडीच्या चालकाचाही या घटनेमध्ये मृत्यू झाला. याबाबत त्र्यंबकेश्वरातील आखाडा परिषदेने निषेध व्यक्त केला आहे. साधू महंतांना मारणाऱ्या सर्व जणांना अटक करावी तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आखाडा परिषदेच्या साधुसंतांनी केली आहे.

आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले की, कल्पवृक्ष बाबा हे जुना आखाडा परिषदेचे होते आणि त्रंबकेश्वरमध्ये राहत होते. काही दिवसांपासून ते मुंबईला गेले होते. त्यांच्या भावाची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या भाऊ गुरुबंधुंना देवाज्ञा झाल्याने त्यांच्या समाधीसाठी ते गुजरातमध्ये निघाले होते आणि त्या दरम्यान पालघरमध्ये या लोकांनी त्यांचा वध केला आहे या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि देशात अशी घटना पुन्हा घडू नये अशी शिक्षा झाली पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे.

चार दिवसांतील दुसरी घटना

विशेष म्हणजे दरोडेखोर आल्याच्या अफवेतून हल्ला करण्याची गेल्या चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. याआधी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या धान्यवाटप करण्यासाठी या भागात आला होता, त्याच्यावरही गावकऱ्यांनी असाच हल्ला केला होता. दरम्यान, अफवा पसरवून कुणी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पालघरचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिला आहे.