माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला

Wardha News : भाजपाकडून लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झालेली आहे. यासाठी राज्यात महाविजय 2024 संकल्प यात्रेला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 2, 2023, 09:51 AM IST
माती खायची का? पंतप्रधान कोण हवा विचारताच बावनकुळेंवर संतापली महिला title=

मिलिंद आंडे, झी मीडिया, वर्धा : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) महाविजय 2024 संकल्प यात्रेला (Sankalp Abhiyan yatra) सुरूवात केली आहे. राज्यात लोकसभेच्या एकून 48 जागांपैकी भाजप 45 पेक्षा अधिक जागा निवडणून आणण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे भाजपकडून राज्यभरात महाविजय 2024 संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. मात्र यावेळी त्यांना जतनेच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचे चित्र आहे.

वर्ध्यातही भाजपाकडून संकल्प ते समर्थन या अभियानाचे आयोजन  करण्यात आले होते. वर्धा शहराच्या मध्य परिसरातील असलेल्या साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंतच्या यात्रेदरम्यान महिलांना 2024 मध्ये कोण देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. त्यावर वर्ध्यातील महिला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संतापल्या. महिला विरोधात बोलू  लागताच बावनकुळेनी माईक पुढे सरकावल्याचेही समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने विचारला. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या महिलेला तुम्ही स्टेजवर चला,आपण स्टेजवर बोलू अशी विनंती केली. यावर संतापलेल्या महिलेने स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? असा प्रतिप्रश्न केला. बानवकुळे यांनी विचारलेल्या प्रश्नानंतर महिला चांगलीच संतापली होती. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अलिबागमध्येही रोष

काही दिवसांपूर्वी या यात्रेच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग मधील नागरीकांशी संवाद साधला होता. यावेळी बाजारपेठेतील एका दुकानदाराच्या उत्तराने बावनकुळे यांची पंचाईत झाली होती. बावनकुळे यांनी बाजारपेठेतील लोकांना पंतप्रधान पदी तम्हाला कोण पहायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. बावनकुळे यांच्या या प्रश्नावर एका दुकानदाराने राहुल गांधी असे उत्तर दिले. या उत्तरामुळे बावनकुळे यांची चांगलीच पंचाईल झाली होती.