कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर

Kolhapur Panchganga River Flood : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे पोहोचली आहे. 

Updated: Jul 15, 2022, 02:53 PM IST
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर title=

कोल्हापूर : Kolhapur Panchganga River Flood : राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला दिसून येत आहे. मात्र, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे पोहोचली आहे. धोका पातळी 6 फुटांनी दूर आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. एनडीआरची पथके तैनात करण्यात आली आहेत.

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर आज दुपारपर्यंत पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी ही 37 फूट इतकी पुढे आहे. 

पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे, प्रशासन अलर्ट मोडवर

तर जिल्ह्यातील एकूण 63 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. इचलकरंजी शहराजवळ असणाऱ्या नदी घाट परिसरात देखील पाणी वाढत आहे. इचलकरंजीहुन शीरदवाड या मार्गावरील जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. इचलकरंजी नदी घाट परिसरात असणारी मंदिरे देखील पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिकमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. सलग 4 दिवसांच्या संततधारेनंतर नदीकाठची दुकानं पुन्हा एकदा सुरू होत आहे. मंदिरासमोरील फुल हार विकणारे तसेच पूजेचे सामान विकणाऱ्यांची पुन्हा व्यवसायासाठी लगबग सुरू झालीय.

तर गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण 10 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे असून पावसाच्या अधून-मधून सरी बरसतायत. वैनगंगा -गोदावरी आणि प्राणहिता नद्यांनी आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती आणलीय. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली आहे.  गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित झाल्यानंतर काही प्रमुख मार्ग अद्यापही बंद आहेत.