काँग्रेसचा हा कोण 'अमजद खान'? ज्याने केला 500 कोटी मानहानीचा दावा...

2017-18 साली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते.

Updated: Mar 24, 2022, 08:00 PM IST
काँग्रेसचा हा कोण 'अमजद खान'? ज्याने केला 500 कोटी मानहानीचा दावा... title=

मुंबई : 2017-18 साली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाचे अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी करण्यात आली होती.

मागील वर्षी विधिमंडळ अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीत फोन टॅपिंगचा प्रश्‍न उपस्थित झाला होता. त्यांनतर या अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडीओ बॉम्ब फोडला. त्यांच्या या व्हिडीओ बॉम्बला करारा जबाब देऊ, असे प्रत्युत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करताना त्यांनी नेत्यांना देण्यात आलेली नावेही वाचून दाखविली होती. यात काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याला 'अमजद खान' हे नाव देण्यात आले होते.

काँग्रेसच्या याच 'अमजद खान' याने पोलीस अधिकारी रश्मी शुक्ल यांच्याविरोधात नागपुरातील दिवाणी न्यायालयात मानहानीचा दावा केला आहे. या नेत्याने शुक्ला यांच्यावर पाचशे कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केलाय.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत नावे वाचून दाखविली होती. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख नागपाडा, मुंबई, भाजप खासदार संजय काकडे यांचे नाव तरबेज सुतार, कात्रज, नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांचे नाव रघू चोरगे, त्यांच्याच दुसऱ्या नंबरला हिना महेश साळुंखे अशी नावे देण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावासमोर 'अमजद खान' असे लिहिण्यात आले होते. या नावावरूनच नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.