लातूर : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं लातूरमध्ये आगमन झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शाह लातूरमध्ये आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांशी अमित शाह यांनी संवाद साधला. लातूर-नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ७१३ भाजपा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये भाजप अध्यक्षांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. 'वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे', असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले. शिवसेनेसोबत युती नाही झाली तरी ४८ पैकी ४० जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील, ही तयारी भाजप कार्यकर्ते करतील, असं वक्तव्य शाह यांनी केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांच्यासमोर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वबळाचे संकेत दिले आहेत. लातूर, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्षांची महाराष्ट्रातली ही पहिलीच बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते, मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीनंतर अमित शाह जिल्ह्यातील विविध घटकातील प्रमुख निवडक नागरिकांशी दयानंद सभागृह येथे संवाद साधतील. अमित शाह हे आज लातूर मुक्कामी असून उद्या म्हणजे ७ जानेवारीला ते लातूर सोडणार आहेत.