जगासाठी बुद्ध उपयोगाचा नाही; संभाजी महाराजच हवेत- संभाजी भिडे

पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो.

Updated: Sep 29, 2019, 03:40 PM IST
जगासाठी बुद्ध उपयोगाचा नाही; संभाजी महाराजच हवेत- संभाजी भिडे title=

सांगली: भारताने जगाला बुद्ध दिला, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर शिवप्रतिष्ठान संघटनेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी आक्षेप घेतला आहे. भारताने जगाला बुद्ध दिला, पण त्याचा काय उपयोग झाला. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवेत, असे भिडे यांनी म्हटले. ते रविवारी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी त्यांनी म्हटले की, भारताने जगाला बुद्ध दिला हे खरे असले तरी बुद्ध उपयोगाचा नाही. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि श्रीकृष्णाची युद्धनीती महत्त्वाची आहे. त्यामुळे बुद्ध नको तर संभाजी महाराज पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तानवर निशाणा साधताना म्हटले होते की, भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला. भारताने जगाला कायम एकतेने नांदण्याचा आणि शांतीचा संदेश दिला, असे मोदींनी म्हटले होते. 

अमेरिकेने एकादशीला यान सोडल्याने मोहीम यशस्वी ठरली- संभाजी भिडे

मात्र, भिडे यांनी मोदींचा हा दावा फेटाळून लावला. पंतप्रधान मोदी चुकीचे बोलले. ती चूक महाराष्ट्र दुरुस्त करू शकतो. ते आपलं काम आहे. भारताने जगाला बुद्ध दिला असला तरी बुद्ध काही उपयोगाचा नाही. विश्वाचा संसार सुखाने चालवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजच हवे असल्याचे यावेळी भिडे यांनी सांगितले. 

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. आचारसंहिता लागू झाली असताना संभाजी भिडे अशाप्रकारची विधाने करतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.