रामदेव बाबांची ताडोबाला भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

४ दिवसांच्या योग शिबिरासाठी चंद्रपुरात आलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निमंत्रणांवरून योगगुरुंनी ताडोबा गाठलं. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 21, 2018, 06:21 PM IST
रामदेव बाबांची ताडोबाला भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे title=

चंद्रपूर : ४ दिवसांच्या योग शिबिरासाठी चंद्रपुरात आलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निमंत्रणांवरून योगगुरुंनी ताडोबा गाठलं. 

दिसला का वाघ?

सुमारे ५० पट्टेदार वाघांच्या अस्तित्वाने श्रीमंत झालेल्या आणि हजारो वन्यजीवांच्या अधिवासाने समृद्ध असलेल्या ताडोबात स्वामी रामदेव यांनी सुमारे २ तास फेरफटका मारला. बाबा रामदेव यांनी व्यक्त केलेली व्याघ्रदर्शनाची इच्छा मात्र अधुरीच राहिली. या सफारीत वाघाने बाबांना हुलकावणी दिली. 

ताडोबात घालवला वेळ

मात्र सध्या जंगलात पानगळ सुरु असल्याने त्यांना छोट्या वन्यजीवांचे मनमुराद दर्शन झाले. यात हरीण, गवे आणि मोरांचा समावेश होता. ताडोबातील सफारीचा आनंद लुटल्यावर स्वामी रामदेव यांनी या वनवैभवाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

योगगुरु बाबा रामदेव यांना चंद्रपूरमध्ये काळे झेंडे दाखवण्यात आले. बांधकाम विभाग कार्यालयापुढे बाबांचा ताफा येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. काळ्या धनावर बोलणारे बाबा गप्प का, असे काँग्रेसचे म्हणणं आहे. त्यामुळेच हा निषेध करण्यात आला.