तुम्ही पिताय केमिकलयुक्त दूध ? तुमच्या आरोग्याशी सुरूय जीवघेणा खेळ

अवघ्या काही सेकंदात तयार होतं भेसळयुक्त दूध, झी 24 तासचं खास इन्व्हेस्टिगेशन 

Updated: Jun 14, 2022, 07:34 PM IST
तुम्ही पिताय केमिकलयुक्त दूध ? तुमच्या आरोग्याशी सुरूय जीवघेणा खेळ  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : असं म्हणतात की, दुधासारखा दुसरा पौष्टिक आहार नाही. दुधात सगळी पोषक तत्वं सामावलेली असतात. आपल्याकडे लहान मुलांना सकाळच्या आहारात आवर्जून दूध दिलजातं. पण तुम्ही ज्या दुधाचं सेवन करता ते सकस असेलच असं नाही.. कदाचित हे दूध केमिकलयुक्तही असू शकतं.

दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ 
केमिकल आणि पाण्यासारखा द्रवपदार्थांचं मिश्रण करुन भेसळयुक्त दुध बनवलं जातं. भेसळखोरीचा हा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागल्यानंतर आमच्या टीमनं तात्काळ अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेतली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

दुधाच्या भेसळखोरीसाठी कोणतं केमिकल वापरण्यात आलंय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र लिक्विड डिटर्जंटसारखं एखादं रसायन वापरून त्यापासून दुधाची निर्मिती केली जात असावी. हेच बनावट दूध चांगल्या दुधात मिसळलं जात असल्याची भीती व्यक्त होतेय. हे भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी अतिशय हानीकारक ठरू शकतं. 

भेसळयुक्त दुधामुळे विविध आजार
या भेसळयुक्त दुधामुळे हाडांचे विविध आजार होऊ शकतात. याशिवाय मूत्रपिंड, हृदय, यकृत निकामी होऊ शकतं. दुधातील केमिकलचा यकृत आणि आतड्यांवर परिणाम होऊन कॅन्सरसारखा दुर्धर आजार होऊ शकतो. याशिवाय लहान मुलं आणि गरोदर महिलांवर याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. 
 
दुधात भेसळ कशी ओळखाल?
दूधात भेसळ आहे की नाही, हे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी देखील ओळखू शकाल. टेस्ट ट्यूबमध्ये 5 ते 10 मिली दूध घ्या, त्यात थोडं सोयाबीन घाला किंवा तूरडाळ पावडर टाका आणि जोरात हलवा. पाच मिनिटं टेस्ट टूयब तशीच ठेवा. त्यानंतर त्यात लिटमस पेपर टाका. लिटमस पेपरचा रंग निळा झाल्यास ते दूध भेसळयुक्त आहे असं समजा. लिटमस पेपरचा रंग लाल राहिल्यास त्या दुधात भेसळ नाही असं समजावं.

तुमची सतर्कताच या भेसळखोरांना अद्दल घडवू शकते. त्यामुळे सावध राहा आणि भेसळीला वेळीच आळा घाला. कारण सवाल तुमच्या आमच्या आरोग्याचा आहे..