राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Updated: Jul 6, 2023, 03:33 PM IST
राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात... title=

Maharashtra Political News Today: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप होतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) काँग्रेसच्या (Congress) वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचं बोललं जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष शिवसेना-भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. यातच धनंजय मुंडे यांनी थेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. पण याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचं सांगितलंय, तसंच पंकजाताई काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असंही नाना पटोले यांनी सांगितलं. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्याकडून याबाबत कोणतंही वक्तव्य आलेलं नाही.

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच'
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे. असं सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. गोपीनाथ मुंडेंनी पक्षासाठी खूप काम केले. त्यामुळेच आज सरकार पाहायला मिळतंय असंही त्यांनी बोलून दाखवल त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. काही मिळालं नाही तर मी ऊस तोडायला जाईन असंही म्हणाल्या. विशेष म्हणजे दिल्लीतील महिला कुस्तीपटूंचं आंदोलन आणि शेतकरी सन्मान योजनेवरून प्रीतम मुंडेंनी देखील भाजपला घरचा आहेर दिला होता.

गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असलेल्या दोन्ही भगिनींनी भाजपविरोधात सूर लावले आहेत. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं भाजप नेतृत्वाचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपनं पंकजा मुंडेंना कुठलीही मोठी जबाबदारी दिलेली नाही. त्यांचं राजकीय पुनर्वसनही केलेले नाही. त्यामुळं अधूनमधून त्यांची नाराजी उफाळून येते. मात्र यावेळी पंकजांच्या साथीला प्रीतम मुंडे देखील पुढं आल्यात. निवडणुकांसाठी जेमतेम वर्ष बाकी असताना मुंडे भगिनींनी असा पक्षविरोधी पवित्रा घेण्याचं कारण काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, असा इशाराच पंकजा मुंडे यांनी दिला होता. तसंच आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या असंही म्हटलं होतं.