बांद्रा - विरार उन्नत मार्ग रद्द, सीएसएमटी - पनवेल नवा उन्नत मार्ग

 अर्थसंकल्पात सीएसएमटी - पनवेल या नव्या उन्नत मार्गाला मान्यता देण्यात आलेय. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 2, 2018, 07:07 AM IST
बांद्रा - विरार उन्नत मार्ग रद्द, सीएसएमटी - पनवेल नवा उन्नत मार्ग  title=

नवी दिल्ली : संसदेत आज २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा आधीचा शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सीएसएमटी - पनवेल या नव्या उन्नत मार्गाला मान्यता देण्यात आलेय. त्यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, प्रस्तावित बांद्रा - विरार उन्नत मार्ग रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी सीएसएमटी - पनवेल या नव्या उन्नत मार्गाला मान्यता देण्यात आलेय. तशी  सूत्रांची माहिती आहे. मुंबईतील रेल्वेच्या विस्तारासाठी ५० हजार कोटी रुपये अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेय. यातून हा उन्नत मार्ग करण्यात येणार आहे.

 प्रचंड गर्दीचा मार्ग असलेल्या सीएसएमटी-पनवेल मार्गावर उन्नत मार्ग बांधण्याची घोषणा २०१६-२०१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. या मार्गाला पुन्हा चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

सीएसएमटी ते पनवेल या हार्बर मार्गावरुन सध्या ४० ते ५० लाख प्रवाशी प्रवास करतात. सिंगल लाईन असलेला हा ट्रॅक कायम प्रवाशांसाठी मनस्ताप देणारा आहे. त्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉर झालास प्रवास सुखकर आणि जलद होण्यास मदत होणार आहे.

कसा असेल उन्नत मार्ग?

- सीएसएमटी ते पनवेल असा ४८ किलोमीटरचा उन्नत मार्ग असेल.

- एकूण ११ स्टेशन्सवर सीएसएमटी-पनवेल गाडीला थांबा असेल

- ४.५ ते ५ मिनिटाला एक गाडी याप्रमाणे तासाला १४ गाड्या धावतील

- गाडीचा कमाल वेग हा तासाला १०० किलोमीटर इतका असेल