आजपासून कामगारांनी कामावर येऊ नये, बेस्टच्या संपावर कृती समिती ठाम

पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नसल्याचा इशारा 

Updated: May 18, 2020, 06:31 AM IST
आजपासून कामगारांनी कामावर येऊ नये, बेस्टच्या संपावर कृती समिती ठाम  title=

मुंबई : बेस्टच्या संपावर बेस्ट कामगार संयुक्त कृती समिती ठाम आहे. आजपासून बेस्ट कामगारांनी कामावर येऊ नये, १००% लॉकडाऊन पाळावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.  तर दुसरीकडे बेस्ट प्रशासनाकडून मात्र बेस्ट बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर धावणारच असा निर्धार केला आहे. त्यामुळे कोरोना संकटात बेस्ट रस्त्यावर धावणार का ? असा प्रश्न अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे, योग्य सुविधा द्याव्या, मृत कर्मताऱ्यांच्या नातलगांना योग्य आर्थिक मोबदला द्यावा या कृती समितीच्या मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी कृती समितीने बंद ची हाक दिली आहे. 

कृती समितीच्या १००% लॉकडाऊनच्या आवाहनानंतर बेस्ट प्रशासनाने कोरोनामुळे मृत झालेल्या चार कर्मचाऱ्यांच्या नातलगांना नोकऱ्या दिल्या आहेत. तसंच, सध्याच्या कठिण परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत खंड पडू देऊ नये असेही आवाहन केले आहे.

कोरोनामुळं बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १२० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ५० जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

गेल्या काही काळापासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात कोरोना व्हायरसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. याच परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्यांच्या प्रवासासाठी बेस्टकडून जवळपास १२००हून जास्त बस सेवेत रुजू करण्यात आल्या होत्या. पण, बेस्ट कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळं तणाव वाढला.

बेस्टमध्ये कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळं जीव गमावला. तर, ९५ हून अधिक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. ही सर्व परिस्थिती आणि बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या मुद्द्याकडे वारंवार होणारं दुर्लक्ष पाहता अखेर सावधगिरी म्हणून बस सेवा बंद करण्याचं ठरवलं गेल्याचं कळत आहे. ज्याअंतर्गत आजपासून बेस्टही शंभर टक्के लॉकडाऊन पाळला जाणार असल्याचं चित्र आहे.

बेस्ट कर्मचारी नेते, शशांक राव यांनी याविषयीची अधिक माहिती देत या संकटाच्या प्रसंगीसुद्धा प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत बेस्टच्या शंभर टक्के लॉकडाऊनच्या निर्णयावर स्पष्टीकरण दिलं. यावेळी नाराजीचा सूर आळवत त्यांनी काही गोष्टी सर्वांसमक्ष ठेवल्या. ज्यामध्ये कोरोनामुळे जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात अद्यापही देण्यात आला नसल्याचं त्यांनी झी २४तासशी संवाद साधताना सांगितलं. 

वैद्यकीय सुविधांचा अभाव असतानाही कर्मचारी स्वत:ची काळजी स्वत: घेत आहेत. पण, परिस्थितीला मिळालेलं गंभीर वळण पाहता, आता बेस्टही पुढील काही दिवसांसाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.