कोरोनाचे संकट । श्रीमंत मुंबई महापालिकेचे मोडले कंबरडे, बँक ठेवीतून काढले पैसे

 कोरोना संकटामुळे मुंबई पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या बँकेतील ठेवीतून पैसे काढावे लागले आहेत.

Updated: Sep 19, 2020, 12:41 PM IST
 कोरोनाचे संकट । श्रीमंत मुंबई महापालिकेचे मोडले कंबरडे, बँक ठेवीतून काढले पैसे   title=
संग्रहित छाया

मुंबई : कोरोना विषाणूने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने अनेक उद्योगधंदे बंद पडले. काहींचे व्यवसायही बंद झाले. त्यामुळे नवे आर्थिक संकट उभे राहिले आहे. आता कोरोना संकटामुळे मुंबई पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे महापालिकेला आपल्या बँकेतील ठेवीतून पैसे काढावे लागले आहेत.

 कोरोना संकटामुळे देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचं कंबरडं मोडले आहे. कोरोनाचे संकट निवारण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागत असताना दुसरीकडे महसुलाद्वारे मिळणारे उत्पन्नात प्रचंड तूट निर्माण झाली आहे. परिणामी मुंबई महापालिकेला पहिल्यांदाच बँकेत असलेल्या ठेवींना हात घालावा लागत आहे. 

आतापर्यंत कोरोना संदर्भातील गोष्टींवर सुमारे १३०० कोटी रूपयांवर खर्च करण्यात आला आहे. ज्यापैकी ९०० कोटी रुपये हे आकस्मिक निधीतून काढण्यात आलेत. तर ऊर्वरीत निधीसाठी बँकेतील ठेवींना हात घालावा लागला आहे. मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे ७० हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. 

त्यातच या ठेवींवरील व्याजदरही कमी झालेले असल्याने यंदा १४०० कोटी रुपयांचे व्याजही कमी मिळणार आहे. जमेची बाजू म्हणजे राज्य सरकारने कोरोना संकटासाठी मुंबई महापालिकेला १ हजार कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मिळत आहे.