मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर

महाराष्ट्रासाठी शॉक देणारी बातमी, महावितरण कंपनीच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी उद्यापासून 3 दिवसांचा संप पुकारला आहे

Updated: Jan 3, 2023, 08:18 PM IST
मोबाईल चार्ज करा, पाण्याच्या टाक्या भरून ठेवा, दळण दळून घ्या... वीज कर्मचारी चालले संपावर title=

Electricity workers strike : आता महाराष्ट्रासाठी (Maharashtra) शॉक देणारी बातमी. उद्यापासून अवघ्या राज्यभरातील बत्ती गुल (Power Cut) होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या (Privatization) हालचालींविरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारलाय. अदानी कंपनीला (Adani Company) वीज वितरण परवानगी (Power Distribution Permit) देऊ नये अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केलीय. प्रधान ऊर्जा सचिव आणि तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष तसंच संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर चर्चा झाली. मात्र ती फिस्कटल्यामुळे 72 तासाचा संप अटळ आहे.

वीज कर्मचाऱ्यांची भूमिका
संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल (BSNL) कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण (MSEB) गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील. पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे. 

उदा BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीडचा  डेटा पॅकला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांच्या विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुल्यामुळे नाराज असतील पण ना नफा ना तोटा तत्त्वावर चालणारा सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे. ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे, असं महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्ष समितीने म्हटलं आहे.

संपकाळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे मागितलेल्या परवान्याच्या विरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या पुकारलेल्या संपकाळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे.

वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई इथल्या मुख्य कार्यालयासह सर्व परिमंडल आणि मंडल कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आली असून हे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. कंपनीने ठरवून दिलेली कामं न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले  आहे. 

हे ही वाचा : आताची मोठी बातमी! डॉक्टरांचा संप अखेर मागे, भाजपच्या संकटमोचकांने काढला तोडगा

संपकाळात वीजपुरवठा अखंडित व नियमित ठेवण्याकरिता महावितरणने नियुक्त केलेल्या एजन्सीचे कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त झालेले अभियंता आणि कर्मचारी यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक व महाऊर्जा या विभागातील अभियंत्यांना या संपकाळात विविध उपकेंद्राच्या ठिकाणी नेमण्यात येणार आहे. महावितरणतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या ज्या एजन्सी या संपकाळात काम करणार नाहीत अशा एजन्सीना तात्काळ बडतर्फ करण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजपुरवठा सुरळित ठेवण्यासाठी ज्याठिकाणी साहित्याची आवश्यकता भासणार आहे. अशा ठिकाणी  आजच साहित्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंता, तंत्रज्ञ, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवार 4 जानेवारीच्या शून्य तासांपासून 6 जानेवारीपर्यत  संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण संपूर्ण काळजी घेत असून याउपरही वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्र. 1800-212-3435/1800-233-3435/1912/19120 यावर संपर्क साधावा. संपात सहभागी असलेल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री  देवेंद्र फ़डणवीस यांच्या उपस्थित उद्या ४  जानेवारीला दुपारी 1.00 वाजता सह्याद्री अतिथी गृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.