देवनारमधील झोपडीपट्टीला आग, महिन्यात दुसरी घटना

जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Updated: Mar 11, 2019, 02:26 PM IST
देवनारमधील झोपडीपट्टीला आग, महिन्यात दुसरी घटना  title=

मुंबई : देवनार कचरा भूमीला आग लागून काही दिवस उलटले नाही, तर पुन्हा एकदा या परिसरात आगीचा धूर उठला. देवनार येथील बैंगनवाडी झोपडपट्टीला आज सकाळी आग लागली. तातडीने आग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे काही जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ही घटना शिवाजीनगरमधील बैंगनवाडी परिसरातील आहे. आज सकाळी या झोपडपट्टीला आग लागली. आग लागल्याचे कळताच, स्थानिकांनी आग्निशमन दलाला माहिती दिली. याची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होण्याअगोदरच नागरिकांनीही आग विझवण्याचे प्रयत्न केले. परंतु अचानक झालेल्या घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीनं भीषण रुप धारण केलं. तसेच आग विझवण्यासाठी पुढे गेलेले काही नागरिक या स्फोटामुळे जखमी झाले. सुदैवाने यात कोणालाही मोठी इजा झालेली नाही. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आग कशामुळे लागली, अद्याप स्पष्ट झाले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. ७ मार्च रोजी देवनार येथील कचराभूमीला आग लागली होती. एकाच महिन्यात दोन वेळा आग लागल्यानं देवनार येथील नागरिक मात्र धास्तावले आहे.