पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?

Ganesh Chaturthi 2023 : आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. नाही का... पाहा कोणी टीपलाय हा फोटो...  

सायली पाटील | Updated: Sep 17, 2023, 01:12 PM IST
पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?  title=
(छाया सौजन्य - Ganesh Vanare / Instagram) | Ganesh Chaturthi 2023 Ganeshotsav viral photo of an old lady on instagram grabs attention

Ganesh Chaturthi 2023 : गणपती येणार म्हटलं की प्रत्येकाच्या मनात वेगवेळ्या भावनांचा काहूर माजतो. अर्थात विचारांची गर्दीही त्यात असते. कोणी होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळं चिंता व्यक्त करत असतो, तर कोणी उत्सवाच्या बदलणाऱ्या रुपाविषयी आपली मतं मांडत असतो. कोणी पोट भरण्यासाठी या उत्सवाकडे पाहत असतो, तर कोणी फक्त त्या गणरायाच्या येण्याचीच वाट पाहत असतो. विचारांच्या वाटेवर तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे वाटसरु आहात हे एव्हाना उमगलंच असेल. याच गणेशोत्सवाचा एक कायमस्वरुपी भाग म्हणजे आठवणी....

आमच्या लहानपणी ना गावात अमुक एक आजी तमुक गोष्ट सांगायची, गणपतीची फेराची गाणी बोलायची. त्यावेळी गणेशोत्सवादरम्यान स्पीकरचा धांगडधिंगा नसून आजीबाई आणि घरातील महिला वर्गाच्या सुरांनीच घरात वेगळा माहोल तयार केला जात होता. हे चित्र जवळपास आपणा सर्वांनीच किमान एकदातरी अनुभवलं असेल. या आजीबाईंविषयी अचानकच बोलण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो.

गणेशोत्सवाच्या निमित्तानं मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेकड्यानं रील्स, फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच एक फोटो बऱ्याचजणांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीपासून अगदी व्हॉट्सअप स्टेटरपर्यंतही ठेवला आहे. काहींनी तो रिशेअर केला आहे. Ganesh Vanare या छायाचित्रकारानं हा फोटो टीपला असून, त्यानं इन्स्टाग्रामवर तो शेअरही केला. हा फोटो इतका बोलका आहे की त्यातील निरागसता पाहताक्षणी लक्षात येते.

एक बोलका फोटो...

गणेशोत्सव सुरु व्हायला आता काही तास उरलेले असतानाच हा फोटो समोर आला जिथं एक आजीबाई आणि त्यांच्या चेहऱ्यावर असणारे भाव नजर खिळवून ठेवणारे होते.  छायाचित्रकारानं हा फोटो इतक्या शिताफीनं टीपला की आजींच्या मागं गणेशमूर्ती असून, त्या मुर्तीच्या भुजा आजीबाईंच्या पाठून अशा दिसत आहेत जणू बाप्पानंच त्यांना पाठबळ दिलं असावं.

हेसुद्धा वाचा : गणेश पुराणः कलियुगातही बाप्पा घेणार अवतार, निळ्या घोड्यावर आरूढ होऊन प्रकटणार गणराय

बाप्पाचा मुकूट, त्याचं सिंहासन, मोठे कान आणि आशीर्वाद देणारा हात इतकंच काय ते दिसत असून, आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. हा फोटो प्रत्येकासाठी वेगळी गोष्ट सांगणारा, वेगळ्या आठवणी जागवणारा आणि तितकाच खास. फोटोच्या निमित्तानं गणपती बाप्पा तुमच्याआमच्या पाठीशी कायमच असतो हीच भावना मनात घर करून जाते आणि नकळतच आपणही त्याच्यापुढे नतमस्तक होतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ganesh Vanare (@haram_khor_)

@haram_khor_ या इन्स्टा आयडीवरून छायाचित्रकारानं टीपलेला हा फोटो पोस्ट करताक्षणीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. एखाद्या सेलिब्रिटीलाही लाजवेल इतकी पसंती या आजीबाईंना आणि त्यांच्यासोबतीनं असणाऱ्या बाप्पाला मिळाली. आणि उत्सवाचं हे रुप पाहताना एका गाण्यातील काही ओळी आठवल्या... तुझ्या कृपेचा हात मस्तकी,.. पायी तव मम चिंता!!!