'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत. 

Updated: Jul 1, 2020, 03:30 PM IST
'राहुल गांधींना पवार समजवून सांगतील', काँग्रेसच्या टीकेला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भारत-चीन मुद्द्यावरून शरद पवारांनी राहुल गांधींवर साधलेल्या निशाण्याचे पडसाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये उमटत आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.

'शरद पवार द्विपक्षीय कराराबद्दल बोलले होते, त्यात शस्त्र हाती घ्यायची नाहीत, असं पवारांना म्हणायचं होतं. पवारांनी राहुल गांधींवर टीका केली  नाही. राहुल गांधींना शरद पवार समजवून सांगतील,' असं राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. 

'राहुल गांधी फार आक्रमकपणे प्रश्न विचारत आहेत. कालच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर त्यांनी शेरोशायरीतून प्रश्न विचारला आहे, त्याबद्दल आमचं मत नाही. राहुल गांधी ज्या आक्रमकपणे बोलत आहेत, ते फार चांगलं काम करतायत,' अशी प्रतिक्रियाही हसन मुश्रीफ यांनी दिली. 

काय म्हणाले नितीन राऊत?

नितीन राऊत यांनी म्हटलं की, 'शरद पवार आमचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे नेते आहेत, यूपीएचे प्रमुख घटकपक्ष आहेत. राहुल गांधी यांनी चीनबाबत व्यक्त केलेली चिंता मूलभूत प्रश्नांबाबत आहे. पवार साहेबांनी विसरायला नको की १९६२ च्या युद्धावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती, देश शस्रसज्ज होत होता.'

'शरद पवार काँग्रेसच्या काळात संरक्षण मंत्री होते, तेव्हा त्यांनी काही चुका दुरुस्त केल्या असत्या, तर बरं झालं असतं,' असा टोलाही नितीन राऊत यांनी लगावला होता. 

शरद पवार काय म्हणाले?

भारत आणि चीनच्या लष्करामध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात झटापट झाली, यानंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'लडाखमध्ये झालेल्या संघर्षात चीनने किती भाग बळकावला आहे याबाबत माहिती नाही. मात्र १९६२ च्या युद्धात चीनने लडाखमधील बळकावेला ४५ हजार चौकिमीचा भाग चीनच्या ताब्यात आहे. तो भाग अद्याप आपल्याला मुक्त करता आलेला नाही, ही बाब विसरता येणार नाही. त्यामुळे आरोप करताना आपण भूतकाळात काय केले आहे, याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या प्रश्नावर राजकारण करणे योग्य नाही.'