मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणात एसीबीनं राष्ट्रवादीचे नेते, तत्कालीन जलसंपदा मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ठपका ठेवल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. 'सरकार त्यांचं काम करतंय... पण न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे... मी वेळोवेळी आरोपांचं निरसन केलंय... याआधीही चौकशीला सहकार्य केलेलं आहे आणि करत राहणार' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय.
आजपर्यंत चौकशीला सहकार्य केलंय यापुढेही करत राहील असं आज माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं. सिंचन गैरव्यवहराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गैरव्यवहाराचा ठपका ठेवल्यावर आज अजित पवार यांनी विधीमंडळात प्रतिक्रिया दिली. सरकार आपलं काम करतंय, मी माझं काम करत राहीन असंही पवारांनी म्हटलंय. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे जास्त बोलणार नाही, पण खालून ज्या फाईल आल्या त्यावर मी सह्या केल्या असंही सांगायला अजित पवार विसरले नाहीत.
दरम्यान ही कारवाई राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केलाय... तर जयंत पाटलांचा हा आरोप धुडकावून लावत ही कारवाई सूडबुद्धीने झाली नसल्याचं दावा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी 'झी २४ तास'शी फोनवरून बोलताना केलाय केलाय. अजित पवार यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होणार, अशी प्रतिक्रियाही गिरीश महाजन यांनी दिलीय. त्यानंतर अजित पवार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार का? असात प्रश्न अनेकांना पडलाय.
अजित पवार यांच्या कार्यकाळात विदर्भामधल्या गोसीखुर्द आणि जीगाव सिंचन प्रकल्पात घोटाळा झाल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. हा तब्बल ६० हजार कोटींचा होता. यासाठी या प्रकल्पाचं कंत्राट ज्यांना देण्यात आलं होतं त्या राष्ट्रवादीचे आमदार संदिप बाजोरिया यांना मोठी आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. रक्कम दिल्यानंतरही या प्रकल्पाचं काम रखडलं आणि हा प्रकल्प अर्धवटच बंद पडला.
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत. सिंचन गैरव्यवहाराला अजित पवारच जबाबदार असल्याचं प्रतिज्ञापत्र एसीबीचे महासंचालक संजय बर्वे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलंय. तांत्रिक मंजुरी नसतानाच तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवारांनी सिंचनाचे कंत्राट दिल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय.
२७ पानांचं हे प्रतिज्ञापत्रात असून यात अजित पवारांवरच ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आलेत. आता अजित पवारांवर काय कारवाई होणार? याबाबत आता चर्चांना उधाण आलंय.