लालबागचा राजा मंडळाला हवं होतं पावणेसहा कोटींचं कर्ज

मुंबईतील सर्वाधिक श्रीमंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबागच्या राजाची ओळख. दरवर्षी सरासरी १५ ते १६ कोटी रुपयांची देणगी गोळा होणा-या या मंडळाला हवं होतं ५ कोटी ८० लाखांचे कर्ज.  

Updated: Aug 6, 2017, 01:08 PM IST
लालबागचा राजा मंडळाला हवं होतं पावणेसहा कोटींचं कर्ज title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  लालबागचा राजा.... लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान. राजा जिथं विराजमान होतो, तिथंच लागून असलेल्या विजया रेसिडेन्सीमधील दुस-या मजल्यावरील सुमारे १८०० चौरस फूट जागा खरेदी करण्याचा निर्णय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतला. 

७ कोटी ३१ लाख रुपये एकूण किंमत असलेली ही जागा खरेदी करण्यासाठी मंडळानं बँक ऑफ महाराष्ट्रकडून 5 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज काढण्याचे ठरवले. चार वर्षात दीड कोटींप्रमाणे कर्ज फेडण्याचीही हमी देण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे परवानगीसाठी अर्जही करण्यात आला. परंतु धक्कादायक म्हणजे मंडळ ज्या इमारतीमधील जागा खरेदी करत होती त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्रच नसल्याचे समोर आले. त्यामुळं नोव्हेंबर 2016 मध्ये धर्मादाय आयुक्तांनी मंडळाला कर्ज घेण्याची परवानगी नाकारली. 

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडं देणगीच्या रुपानं दरवर्षी सरासरी 15 कोटी रुपये जमा होत असताना मंडळावर कर्ज काढण्याची गरज का पडली आणि जागा खरेदीसाठी ओसी नसलेली इमारत का निवडण्यात आली असा प्रश्न आता विचारला जातोय.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे मानद सचिव सुधीर साळवी यांना याबाबत विचारले असता, त्यांनी मंडळानं कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता, परंतु याची परवानगी न मिळाल्यानं जागा खरेदीच केली नाही. त्यामुळं जे घडलंच नाही, त्यावर बोलू शकत नसल्याचा खुलासा केलाय. तर मंडळानं धर्मादाय आयुक्त कार्यालयाला 2016 मध्ये दिलेल्या माहितीनुसार मंडळाकडं 6 कोटी रुपयांची मुदत ठेव, ९९ ग्रँम सोने, १०८ ग्रँम चांदीचा मुकुट बाकी आहे. तर काही चांदीच्या विटा शिल्लक आहेत. 

सर्वाधिक श्रीमंत गणेश मंडळ असलेल्या लालबागचा राजा मंडळास कर्ज काढण्याची वेळ का येते हा खरा प्रश्न आहे.