'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

Maharashtra Politics : महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतची अद्याप घोषणा झालेली नसताना उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची  मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषणा केली.  

आकाश नेटके | Updated: Mar 10, 2024, 11:41 AM IST
'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका title=

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या घोषणांसाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे.अशात राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. याच दरम्यान, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तिकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. मात्र या निर्णयामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसच्या बड्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत.
 
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमोल कीर्तिकर यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषित केले. अमोल कीर्तिकर यांचे वडील आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी अमोल यांची उमेदवारी जाहीर केली. यावर आता काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत निरुपम यांनी उद्धव ठाकरे आणि अमोल कीर्तिकर यांच्यावर टीका केली.

"काल संध्याकाळी उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरी येथील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित केला. याबाबत रात्रीपासून फोन येत आहेत. हे कसे होऊ शकते?
महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. ही जागाही प्रलंबित असलेल्या 8-9 जागांपैकी एक आहे, असे मला जागा वाटपाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा.
शिवसेनेने कोणाचे नाव सुचवले आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकने लाच घेतली आहे. काय आहे खिचडी घोटाळा? कोविडच्या काळात, मुंबई महापालिकेद्वारे जबरदस्तीने स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न पुरवण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम होता. शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवाराने गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून कमिशन घेतले आहे. ईडी संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करतील का? दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला माझा हा नम्रपणे प्रश्न आहे," असे संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून घोषणा केल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडी (MVA) च्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान 'इंडिया' आघाडीमधील संघर्ष वाढू शकतो.