तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?

Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 19, 2024, 10:07 PM IST
तारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात? title=

MVA Seat Sharing 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. पण अद्याप महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा तिढा अद्याप कायमच आहे. महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. महाविकास आघाडीने मात्र अद्याप एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 21 मार्चला मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) चार जागांची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. या जागेवर प्रकाश आंबेडकरांची संमती मिळाल्यास जागा वाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच नाही, मविआकडून त्यांना 4 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. तर वंचित बहुजन आघाडीनं मविआकडून कोणताही अल्टिमेटम देण्यात आलेला नसल्याची भूमिका जाहीर केलीय.

प्रकाश आंबेडरांचं काँग्रेसला पत्र
प्रकाश आंबेडकरांच्या पत्रामुळे मविआत पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालाय. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंना पत्र लिहून काँग्रेसला 7 जागांवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवलीय. त्यासाठी काँग्रेसनं आपल्या 7 उमेदवारांची नावं लवकरात लवकर जाहीर करावीत अशी मागणी त्यांनी केलीय. या पत्रात त्यांनी आपला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटावर विश्वास नसल्याचंही म्हंटलंय. त्यामुळे काँग्रेसच्या 7 जागा वगळता इतर जागांवर ते आंबेडकर स्वतंत्रपणे लढणार का? हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्वाधिक 20 जागा मिळतील. तर काँग्रेस 18 आणि एनसीपी शरदचंद्र पवार गटाच्या खात्यात 10 जागा मिळतील. काँग्रेस आपल्या वाट्यातील एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्याची शक्यता आहे. 

शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात
शरद पवार स्वत: लोकसभा निवडणूक लढणार का याची आता जोरदार चर्चा सुरु झालीय. कारण लोकसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे असं शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलंय. मी आजवर 14 निवडणुका लढवून जिंकलो आहे. यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचं चार वर्षांपूर्वीच जाहीर केलंय. मात्र माढा, सातारा किंवा पुण्यामधून निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. तर वर्ध्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढा, अशी ऑफर शरद पवारांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना दिलीय. वर्ध्यामधले काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. वर्धा लोकसभा मतदार संघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, या मागणीसाठी काळे यांनी पवारांची भेट घेतली. मात्र तुम्हीच राष्ट्रवादीकडून वर्ध्यात उभे राहा, अशी ऑफर पवारांनी त्यांना दिलीय. 

सोलापूरातून प्रणिती शिंदे?
दुसरीकडे सोलापुरातील मविआचा उमेदवार सुशीलकुमार शिंदेंनीच जाहीर केलाय. प्रणिती शिंदेंच्या नावाची घोषणा सुशीलकुमार शिंदेंनी केलीय. प्रणितीसारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचे नाव दिल्लीत गाजवू द्या, असे आवाहन सुशीलकुमार शिंदेंनी केलीय. त्यामुळे सोलापुरातून प्रणिती शिंदे लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

विनोद घोसाळकर यांना उमेदवारी निश्चित?
उत्तर मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विनोद घोसाळकरांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय. या मतदारसंघातून घोसाळकरांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याचसाठी उत्तर मुंबईतले ठाकरे गटाचे पदाधिकारी सोशल मिडियावर कामाला लागलेत. त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपचे पियुष गोयल आणि विनोद घोसाळकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. 

नागपूरात गडकरींना काँग्रेसचं आव्हान
नागपुरात काँग्रेसचे सर्व गट एक संघपणे पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर जोरदार आव्हान निर्माम होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विलास मुत्तेमवार यांच्यासह राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नागपूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे, विधान परिषदेचे काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी, युवा नेते विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर असे सर्व नेते होते. या बैठकीत आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.