कोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन होत आहे. शरद पवार आणि अजित पावर यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. पण यामुळे राज्यभरातला कार्यकर्ता संभ्रमात सापडला आहे.

राजीव कासले | Updated: Jul 4, 2023, 03:34 PM IST
कोणता झेंडा हाती घेऊ? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं उद्या शक्तिप्रदर्शन... कार्यकर्ता संभ्रमात title=

Maharashra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन्ही गटांचं उद्या मुंबईत शक्तिप्रदर्शन आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्या राष्ट्रवादीची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावलीय. राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिका-यांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अजित पवारांसह (Ajit Pawar) गेलेल्या आमदारांनाही परत येण्याच्या अल्टिमेटमचा उद्याचा अखेरचा दिवस आहे. तर दुसरीकडे उद्याच अजित पवारांनीही मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचं ठरवलंय. वांद्रे एमईटी इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, मोठे पदाधिकारी यांना या बैठकीचं निमंत्रण आहे. स्वतः अजित पवारांनी या बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलंय. शरद पवारांचा उद्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्याचवेळी अजित पवारांनीही भव्य मेळावा घेण्याची हाक दिलीय. त्यामुळे आता कोणत्या गटाकडे खरी ताकद आहे हे उद्याच मुंबईत दिसून येईल.

कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संभ्रमात आहे. पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी उद्याच्या दोन्ही बैठकांना जाण्याचा निर्णय घेतलाय. तर शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र यावं, अशी कळकळीची विनंती कार्यकर्त्यांनी केलीय. तर पुणे शहर पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर असल्याची घोषणा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलीय. पुण्यामधले पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी असल्यासंदर्भातली प्रतिज्ञापत्र आजच्या बैठकीत भरुन घेण्यात आली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी माजी आमदार जयदेव गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. मात्र शहरातले दोन आमदार सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या बैठकीला अनुपस्थित होते. 

चंद्रपूरमध्येही संभ्रमाचं वातावरण
राज्यातल्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये कोणासोबत जावं याचा संभ्रम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते अजित पवारांसोबत जाणार नाही असा दावा जिल्हाध्यक्षांनी केलाय. अजित पवारांच्यावतीनं पटेल आणि आत्रामांनी जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन केल्याचंही जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय. 

अमोल कोल्हेंचा राजीनामा
शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. शरद पवारांची दुपारनंतर सिल्व्हर ओकला भेट घेत ते आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. शपथविधीला अजित पवारांसह असलेले खासदार कोल्हे यांनी आपली भूमिका बदलत आपण शरद पवारांसह असल्याचं काल म्हटलंय. त्यानंतक आज ते खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. पवारांसह पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.